विठ्ठल-रुक्मिणीचे दागिने वितळविण्या वेळी वजन प्रक्रियेचे होणार अखंडित चित्रीकरण
पंढरपूर, दि. 16 :- श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस सन 1985 ते 2019 कालावधीमध्ये भाविकांकडून दान करण्यात आलेल्या लहान व वापरात नसलेले 19 किलो 824 ग्रॅम सोने व 425 किलो 877 ग्रॅम चांदीचे दागिने वितळविण्यात येणार असून याचया वजन प्रक्रियेचे अखंडीत चित्रीकरण होणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस भक्तांकडून देणगीच्या स्वरूपात सोने,चांदीचे अलंकार व वस्तू अर्पण केल्या जातात. 1985 ते 2019 कालावधीमध्ये भाविकांकडून दान करण्यात आलेल्या लहान व वापरात नसलेल्या वस्तूमध्ये सुमारे 19 किलो 824 ग्रॅम 256 मिलीग्रॅम सोने व 425 किलो 877 ग्रॅम 644 मिली चांदी आहे. ती वितळविण्यात येणार आहे. याबाबत नवीन भक्तनिवास येथे बैठक घेण्यात आली. यास मंदीर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, विधी व न्याय विभागाचे सहसचिव सुभाष कर्हाळे, मंदिर समितीचे समितीचे सदस्य डॉ. दिनेश कुमार कदम, संभाजी शिंदे, शिवाजीराव मोरे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक संजीव गोसावी उपस्थित होते.
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस भाविकांकडून देणगी रूपाने व दक्षिणा पेटीत 1985 ते 2019 या कालावधीत देणगीच्या स्वरूपात प्राप्त झालेल्या सोने व चांदीचे अलंकार वितळविण्यासाठी शासनाकडून मान्यता मिळाली आहे. यामुळे 19 किलो 824 ग्रॅम 256 मिली सोने व 425 किलो 877 ग्रॅम 644 मिली चांदी वितळविण्यात येणार आहे. अलंकारपैकी जे अलंकार असामान्य कलाकुसरीचे तसेच पुरातन व दुर्मीळ असतील त्याचबरोबर जे अलंकार उत्सवा प्रसंगी ‘श्री’साठी वापरलेत जातात ते सदैव जतन करून ठेवण्यात येणार असल्याचे गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. तसेच सोने चांदीचे दागिने वितळून त्याच्या विटा तयार करणे, त्या बँकेत ठेव स्वरूपात ठेवणे , विक्री करणे, नवीन अलंकार तयार करण्यास शासनाने परवानगी दिली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
वितळविण्यात येणार्या अलंकाराची वाहतूक करण्यापूर्वी विमा उतरविण्यात यावा. वस्तूच्या सिलबंद पेट्या वाहनातील बंदिस्त जागेत ठेवून ती जागा सीलबंद करावी. वाहतुकीसाठी पोलीस संरक्षणाची संपूर्ण व्यवस्था करण्यात यावी. संबधित वाहन वस्तू वितळविणार्या रिफायनरीत पोहेोचल्यानंतर मंदिर समितीचे सदस्य, कार्यकारी अधिकारी, शासनाचे अधिकारी यांच्या समक्ष सर्व पेट्या वाहनातून बाहेर काढाव्यात व त्यातील अलंकार व वस्तू बाहेर काढून इंडिया गव्हर्मेंट मिंट, मुंबई रिफायनरीमध्ये पुन्हा वजन करण्यात यावे. यानंतर ते वितळविण्याकरिता रिफायनरीच्या ताब्यात देण्यात यावेत, असे विधी व न्याय विभागाचे सहसचिव सुभाष कराळे यांनी सांगितले.
अलंकाराचे व वस्तूचे वजन करण्यापूर्वी त्यावरील खडे, कलाकुसरीसाठी वापरण्यात आलेले रेशमी हे काळजीपूर्वक काढून घेण्यात येणार आहे . दागिन्याचे वजन करताना राष्ट्रीयकृत बँकेचा तसेच बँकेने नेमलेला सराफ व मंदिर समितीचा वजन काटा व समितीमार्फत नेमलेले सराफ यांच्याकडून वजन केले जाणार आहे. वजन करतेवेळी वैद्यमापन शास्त्र विभागाचे अधिकारी, मंदिर समितीचे सदस्य, शासनाचे अधिकारी तसेच राष्ट्रीयकृत बॅकेचे अधिकारी उपस्थित राहणार असून, या प्रक्रियेचे अखंडित व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी यावेळी सांगितले