भाई गणपतआबा देशमुख यांच्या कुटुंबियाचे खा. शरद पवार यांच्याकडून सांत्वन
सांगोला- महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्माचार्य व शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई गणपतराव देशमुख यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी ५० वर्षांचे मैत्रीचे संबंध होते. रविवारी ८ रोजी खासदार पवार सांगोल्यात आले व त्यांनी देशमुख कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली.
यावेळी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार यशवंत माने,सोलापूर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे सह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी पवार यांनी भाई गणपतराव देशमुख यांच्या पत्नी, पूत्र पोपटराव व चंद्रकांत देशमुख तसेच नातवंडे यांची भेट घेतली.
पवार व देशमुख यांचे संबंध अत्यंत घनिष्ठ होते. १९७८ ला पुलोद सरकार काळात भाई देशमुख हे पवार मंत्रिमंडळात मंत्री होते तर १९९९ ला आघाडी सरकारमध्ये पवार यांच्या आग्रहाखातर देशमुख मंत्री झाले होते. राज्यात शेकाप व राष्ट्रवादी यांच्यात कायम दोस्ताना राहिला. रविवारी पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.