गाळपात “विठ्ठल” तर साखर उताऱ्यात “पांडुरंग” साखर कारखाना आघाडीवर
पंढरपूर – यंदाच्या 2023-24 च्या गळीत हंगामात गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा चांगले गाळप करत असून दररोज किमार 8 हजार टन उसाचे गाळप होत असून 49 दिवसात या कारखान्याने 3 लाख 74 हजार 400 टन उसाचे गाळप करत 9.36 च्या साखर उताऱ्याने 3 लाख 39 हजार हजार साखर पोती तयार केली आहेत. तर पांडुरंग कारखाना हा 10.78 साखर उताऱ्याने आघाडीवर आहे.
श्रीपूरच्या पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने या हंगामात आतापर्यंत 48 दिवसात 3 लाख 44 हजार 482 टन ऊस गाळप करून 3 लाख 28 हजार साखर पोती तयार केली आहेत. हा कारखाना प्रत्येक वर्षी चांगला साखर उतारा मिळवत असून गाळप ही उच्चांकी करतो. येथील सभासदांना जिल्ह्यात सर्वात चांगला दर मिळत आहे.
दरम्यान सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याने 41 दिवसात 67 हजार 850 टन ऊस गाळप करून 42 हजार 450 साखर पोती तयार केली आहेत. यंदा उसाची कमतरता असल्याने अनेक कारखाने कमी क्षमतेने चालत आहेत. सहकार शिरोमणी कारखाना प्रतिदिन जवळपास 2500 ते 2600 टनाने सुरू असल्याचे दिसत आहे.
गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा अभिजित पाटील यांच्या ताब्यात गेल्यापासून सलग दुसऱ्या वर्षी तो चांगला चालत आहे. मागील हंगामात सात लाख टन उसाचे गाळप या कारखान्याने केले होते. तर आता सध्या तो पंढरपूर तालुक्यात ऊस गाळपात आघाडीवर असल्याचे दिसत आहे. मागील ऊसबिल मिळाल्याने व यंदाही चांगला दर घोषित केल्याने विठ्ठल कारखान्याला ऊस देण्यास शेतकरी तयार होत आहेत. सध्या हा कारखाना ऊस गाळपात पांडुरंग च्या पुढे आहे.