राजकिय

शह-काटशहासाठी नवी राजकीय समीकरणं !

पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघातील राजकारण सतत बदलत असून भाजपाचे आमदार समाधान आवताडे यांच्याविरोधात माजी आमदार प्रशांत परिचारक व भगीरथ भालके प्रणित समविचारी आघाडी आणखीच आक्रमक होताना दिसत आहे. परिचारक व भालके एकाच व्यासपीठावर येवून आवताडे यांना आव्हानं देत असल्याचे चित्र आहे. दामाजी कारखान्याच्या निवडणुकीपासून सुरू झालेले हे शह-काटशहाचे राजकारण ग्रामपंचायत रणधुमाळीनंतर अन्य निवडणुकात कायम राहिल असे दिसत आहे.
पंढरपूर मतदारसंघातील राजकारण सध्या वेगळ्याच वळणावर असून पक्षांपेक्षा आपले गट सांभाळण्याची कसरत सध्या येथे होताना दिसत आहे. दामाजी व विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीनंतर नवीन समीकरण उदयास आली आहेत. दामाजी साखर कारखान्याच्या निवडणुकीत  परिचारक व भालकेंचा समविचारी प्रयोग यशस्वी झाला आहे. आमदार आवताडे यांना रोखण्यात त्यांना यश आल्यानंतर मंगळवेढा भागात हा समविचारी प्रयोग आता ग्रामपंचायत निवडणुकीत राबविला गेला आहे. यानंतर प्रशांत परिचारक व भगीरथ भालके हे पंढरपूरच्या राजकारणातील विरोधक आता एकाच व्यासपीठावरून नव्या समीकरणांचे सूतोवाच करू लागले आहेत.
विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीपासून तालुक्याच्या राजकारणात अभिजित पाटील हे परिचारकांबरोबरच भालके गटाला आव्हानं देत आहेत. यातच त्यांची महत्वकांक्षा वाढत चालली असून ते विधानसभेची तयारी करताना दिसत आहेत. ते भाजपा व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांशी सलोख्यचे संबंध राखून आहेत. हे पाहता परिचारक व भालके गटाने एकत्रित येवून काही नवीन प्रयोग केला तर आश्‍चर्य वाटू नये, अशी राजकीय परिस्थिती सध्या येथील राजकारणात दिसत आहे. 2009 पासून भालके व परिचारक यांच्यात राजकीय संघर्ष आहे मात्र आता बदलत्या परिस्थितीत हे गट एकमेकांच्या जवळ आले आहेत.
परिचारक हे भाजपात असले तरी त्यांनी दामाजी कारखान्यात आमदार आवताडेंना तर भीमा कारखान्यात खासदार धनंजय महाडिक या स्वपक्षीय नेत्यांनाच आव्हानं दिले होते. यामुळे हा गट आपली ताकद अबाधित ठेवण्यासाठी काम करताना दिसत आहे. तर दुसरीकडे भगीरथ भालके यांनी 2021 ची पोटनिवडणूक व नंतर विठ्ठल कारखाना निवडणुकीत पराभव स्वीकारल्याने त्यांना आपल्या गटाची ताकद शाबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत. यातूनच समविचारी आघाडीची स्थापना झाली असून त्यांना दामाजी कारखाना व ग्रामपंचायत निवडणुकीत यश मिळाले आहे. अशीच आघाडी पुढे ठेवण्याचा मानस भालके व परिचारक यांचा दिसत आहे. उघडपणे ते आता एकाच व्यासपीठावरून भाषण देत आहेत.
2021 ला परिचारकांनी भाजपाच्या आग्रहास्तव आवताडे यांना सहकार्य केले असले तरी आता पुढील निवडणुकांमध्ये ते कदाचित आपली स्वतंत्र भूमिका ठेवणार असे दिसत आहे. आ. आवताडे यांनीही आपला गट पंढरपूर भागात विस्तारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अनेकजण त्यांना सहकार्य करतानाही दिसत आहेत. बदलती राजकीय समीकरण पाहता आवताडे देखील पंढरपूर भागातील काही दिग्गजांना आपल्या बाजूला घेवून येणार्‍या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये चमत्कार घडविण्याचा प्रयत्न करणार हे निश्‍चित आहे.
सध्याची बदलती राजकीय परिस्थिती पाहता आ. आवताडे व विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांना रोखण्याचा प्रयत्न हा येथील जुने गट असणार्‍या परिचारक व भालके यांचा असल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीबाबत ज्या त्या वेळी विचार करू पण आता आपले गट शाबूत ठेवत ताकद वाढविण्यावर या भगीरथ भालके व प्रशांत परिचारक यांनी भर दिल्याचे चित्र आहे. दरम्यान या सर्व हालचालींवर सत्ताधारी भाजपाचे लक्ष असणार हे निश्‍चित आहे. 
Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close