परिचारकांच्या राजकारणाची नवी रणनीती ,जिल्हा व मतदारसंघात जास्त सक्रिय होण्याची तयारी
पंढरपूर – पंढरपूर अर्बन बँकेच्या निवडणुकीत स्वतःचा उमदेवारी अर्ज मागे घेत माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी या संस्थेची धुरा तरूण पिढीकडे सोपविण्याचा निर्णय घेत आपल्या गटाच्या राजकारणाची नवी रणनीती तयार केल्याचे दिसत आहे. यापुढील काळात परिचारक हे जिल्ह्याच्या व मतदारसंघाच्या राजकारणात आणखी सक्रियपणे काम करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.
अर्बन बँक ही आर्थिक संस्था असून 2900 कोटी रूपयांची उलाढाल व राज्यभरात 31 शाखा आहेत. या बँकेचा कारभार प्रशांत परिचारक यांनी 2002 पासून ते आत्तापर्यंत सलग पाहिला आहे. आता तेथे तरूणांना संधी देण्याचा त्यांनी निर्णय घेतला व स्वतः संचालक मंडळात न जाता त्यांनी मार्गदर्शकाची भूमिका स्वीकारली आहे. यावरून आता ते विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्याच्या राजकारण व सहकारासाठी जास्तीत जास्त वेळ देणार हे निश्चित आहे.
येत्या काळात सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक ही होणे बाकी आहे. याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विधानपरिषद निवडणुका होणे बाकी आहे. यात परिचारक यांनी जास्त सक्रिय व्हावे, असे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना ही वाटतच असणार आहे. 2014 ला भाजपात आलेल्या परिचारक यांना हाताशी धरून देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याच्या राजकारणात भाजपाला अग्रस्थानी नेवून बसविले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ही त्यांना चांगले यश मिळाले आहे. आता बरजेच्या राजकारणासाठी प्रशांत परिचारक यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जावू शकते.
परिचारक यांनी गेल्या काही दिवसांपासून पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातही पुन्हा जोरदार फिल्डींग लावण्यास सुरूवात केली आहे. 2021 ला आमदार समाधान आवताडे यांची साथ करत येथे भाजपाचे कमळ फुलविण्यास मदत केली होती. मात्र आता परिचारक गट या मतदारसंघात आपली ताकद वाढवत असून त्यांचीही विधानसभेची तयारी दिसत आहे. या जिल्हा व मतदारसंघातील राजकीय रणनीतींसाठी परिचारक यांना वेळ हवा असल्याने ते बँकेत मार्गदर्शकाच्या भूमिकेत काम पाहणार असल्याचे दिसत आहे. यापूर्वी ही स्व. सुधाकरपंत परिचारक यांनी अशीच भूमिका स्वीकारत बँकेचा कारभार प्रशांत परिचारक व त्यांच्या सहकार्यांकडे सोपविला होता तर आता प्रशांत परिचारक यांनी तरूण नेतृत्वाकडे ही जबाबदारी दिली आहे.
दरम्यान आपल्या राजकीय जीवनाचा संस्थेवर परिणाम होवू नये, अशी भूमिका परिचारक यांनी आज मांडली असून याचे स्वागत होत आहे. स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनानंतर आता प्रशांत परिचारक हेच पांडुरंग परिवाराचे कुटुंबप्रमुख बनले आहेत. साखर कारखाने, नगरपरिषद, पंचायत समिती, बाजार समिती व अन्य संस्था त्यांच्याच मार्गदर्शनाखाली चालत आहेत. याचबरोबर पांडुरंग परिवाराची राजकीय दिशा ही तेच ठरवत असल्याने त्यांना यासाठी वेळ मिळणे आवश्यक आहे. याच बरोबर पुढील नेतृत्व तयार करण्यासाठी ही जबाबदारी टाकणे आवश्यक आहे.
यापुढील काळात परिचारक गट आणखी प्रभावीपणे काम करेल अशी चिन्ह आहेत. या गटाचे कार्यकर्ते कट्टर आहेत. त्यांची राजकीय महत्वकांक्षा आहे. पांडुरंग परिवारात आमदारकी हवी आहे तर जिल्ह्यातील संस्थांवरही पूर्वीप्रमाणे त्यांना वर्चस्व आहेत. यासाठी आता हा गट नवनवीन रणनीती आखत असून विरोधकांचे लक्ष ही त्यांच्या या हालचालींकडे नक्कीच आहे.