विशेष

उजनीवरील ब्रिटिशकालीन पुलाने 167 वर्षे सेवा दिली

जड वाहतुकीसाठी आता तो बंद

 

पंढरपूर – सोलापूर – पुणे जिल्ह्याच्या सीमेवर तालुक्यातील कोंढारचिंचोली नजीक उजनीच्या पाण्यात गेली 41 वर्षे उभा असलेल्या 167 वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन डिकसळ पुलाच्या बांधकामाचे काही दगड निखळले असून येथे भगदाड पडल्याने आता या पुलावरील जड वाहतूक बंद करण्यात आली आहे.


सोलापूर जिल्ह्यातील करमाळा आणि पुणे जिल्ह्यातील भिगवण दरम्यान असलेला हा पूल वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा आहे. मात्र काळाच्या ओघात पुलाच्या अवस्थेकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. वास्तविक पाहता जड वाहतुकीसाठी प्रवेश बंदी असलेला हा पूल वयोमानाबरोबरच इतरही अनेक बाबींमुळे कमजोर बनला आहे.
सावित्री नदीवरील महाड येथील ब्रिटिशकालीन पूल अचानकपणे कोसळून झालेल्या त्या दुर्घटनेनंतर राज्यातील असे जुने पूल प्रसिद्धीत आले होते. त्यावेळी तालुक्याच्या पश्‍चिम भागातील भीमा नदी पात्रावरील हा ब्रिटिशकालीन पूलही चांगलाच चर्चेत आला होता. मात्र त्यानंतर याच्या अवस्थेकडे व यावरील वाहतुकीकडे गांभीर्याने पहिले गेले नाही.
वास्तविक पाहता 1855 मध्ये रेल्वे मार्गासाठी ब्रिटिशांनी बांधलेला हा पूल होता. परंतु, नंतरच्या काळात रेल्वेमार्गात बदल झाल्याने तो रस्ते पूल म्हणून वापरात येवू लागला. याचा असाच वापर अद्यापही सुरू असून या पुलाला आता 167 वर्षे झाली आहेत. दरम्यान सन 2000 मध्ये या पुलाचे आयुष्य संपले असून तो वाहतुकीस धोकादायक  असल्याच्या चर्चा सुरु होत्या. परंतु त्यानंतरही गेले बावीस वर्षांपासून याचा वापर सुरूच आहे.
करमाळा तालुक्याच्या पश्‍चिम भागातील पस्तीस गावांतील नागरिकांच्या प्रवासासाठी हा पूल महत्वपूर्ण मानला जातो. गेल्या सहा, सात वर्षांपासूनची पुलाची स्थिती पाहिली तर, याच्या दगडी बांधकामाला काही ठिकाणी तडे जाणे, पुलाच्या बांधकामात पिंपळ, वडासारखी झाडे ठिकठिकाणी उगवणे, पुलावरील रस्ता पूर्णपणे खड्डेमय होणे, असे प्रकार होताना दिसत आहेत.
दरम्यान ब्रिटिशकालीन डिकसळ पूल जड वाहतुकीसाठी धोकादायक असून केवळ जीप, कार, दुचाकीसाठीच याचा वापर करावा, अशा आशयाचा फलक पुलावर लावण्यात आलेला आहे. पूल जड वाहनांसाठी धोकादायक असतानाही याठिकाणी नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही प्रभावी यंत्रणा नाही.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close