विशेष

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आषाढीसाठी पंढरपुरात 14 आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना

पंढरपूर, दि.10 : कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने आषाढी यात्रा प्रतीकात्मक स्वरुपात साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. परवानगी दिलेल्या 10 मानाच्या पालख्यांना पंढरपुरात प्रवेश देण्यात येणार असून  या पालखी सोहळ्याबरोबर येणार्‍या वारकर्‍यांना आवश्यक सोयी-सुविधा तत्काळ मिळाव्यात तसेच  आरोग्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतही अडचण येऊ नये यासाठी पंढरपुरात 14 आपत्ती व्यवस्थान कक्षाची स्थापना करण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
कोरोना संसर्गाच्या  पार्श्‍वभूमीवर यंदा प्रथमच आरोग्य व्यवस्थापनासाठी उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर तसेच स्वच्छतेसाठी नगरपरिषद येथे आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे.  वाखरी तळ, विसावा मंदीर, चंद्रभागा नदी वाळवंट, संत तुकाराम भवन, मंदिर परिसर, शासकीय विश्रामगृह, गोपाळपूर तसेच सांस्कृतीक भवन, प्रांत कार्यालय येथे मध्यवर्ती आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचे ढोले यांनी सांगितले.
वाखरी पालखी तळाचे बॅरेकेटिंग, स्वच्छता, विद्युत व्यवस्था, स्वछतागृहे, आरोग्य तपासणीसाठी वैद्यकीय व्यवस्था, वॉटर प्रूफ मंडप या व्यवस्था पालखी तळावर करण्यात येणार आहेत. कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी यात्रा कालावधीत आरोग्य व स्वच्छतेला  प्राधान्य  दिले जाणार आहे. यासाठी फिरते आरोग्य तपासणी पथक, मुबलक औषधसाठा, रक्तसाठा , सुसज्ज रुग्णवाहिका, तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक नेमले जाणार आहे. मंदिर व परिसर,  नदी पात्र, घाट, प्रदक्षिणा, मार्ग या ठिकाणी वेळोवेळी स्वच्छता केली जाणार आहे.  वारकरी साप्रंदायाची परंपरा जतन करत कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने घेतलेला  निर्णय नागरिकांच्या व भाविकांच्या हिताचा असून निर्णयाचा मान राखून पालन करावे, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे.      

Header

Related Articles

Back to top button
Close
Close