पंढरपूर राष्ट्रवादीमधील गटबाजीवर पुन्हा एकदा वरिष्ठ पातळीवरूनच उतारा
पंढरपूर- राज्यात सत्ता आल्यापासून पंढरपूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक गट तयार झाले असून त्यांच्यात समन्वय साधण्यासाठी पालकमंत्री दत्तामामा भरणे यांना बैठक घ्यावी लागली. मात्र त्यांच्यासमोरच मतभेद उघडपणे मांडले जावू लागल्याने त्यांनीही हात टेकत वरिष्ठ नेत्यांवर हा विषय सोपविल्याचे स्पष्ट केले.
आषाढी यात्रेच्या नियोजन बैठकीस आलेल्या पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी विश्रामगृह येथे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व नेत्यांची बैठक घेतली. यास विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष भगीरथ भालके, सहकार शिरोमणीचे अध्यक्ष कल्याणराव काळे, सुभाष भोसले, युवराज पाटील, गणेश पाटील, अॅड. दीपक पवार, सुधीर भोसले, संदीप मांडवे, श्रीकांत शिंदे, संतोष सुळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
जेंव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता नव्हती तेंव्हा पंढरपूर शहर व तालुक्यात पक्षाचे पदाधिकारी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच उरले होते. परंतु सत्तांतरानंतर पुन्हा राष्ट्रवादीला खर्या अर्थाने अच्छे दिन आले आहेत. अनेक सुप्त नेते आता सक्रिय झाले आहेत. यावरूनच आता निष्ठावंत व नवे असा जणू वादच रंगला आहे. यामुळे मागील काही महिन्यापासून राष्ट्रवादीची आंदोलने, वर्धापनदिन हे कार्यक्रम दोन- दोन वेळा झाले आहेत.
तालुक्यातील पदाधिकार्यांमध्ये संवाद नसल्यामुळे पक्ष एकसंघ नसल्याचे चित्र होते. याबाबत काहीजणांनी वरिष्ठ पातळीवर तक्रारी देखील केल्या आहेत. यामुळे भरणे यांनी विश्रामगृह येथे सर्व पदाधिकार्यांना एकत्र आणले होते. यावेळी कल्याणराव काळे यांनी, दोन दोन आंदोलने होतात, कार्यक्रम होतात आम्ही कुठे जायचे असा प्रश्न केला. तसेच पक्षाचे शहरातील अधिकृत कार्यालय कुठले अशीही विचारणाही केली. यावरून वातावरण चांगलेच तापले होते. यातच शहराध्यक्ष बदलाचा विषय पुढे येताच विद्यमान अध्यक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला. सत्ता नसताना आम्ही पक्ष सांभाळला व आता काहीजण पुढे येत आहेत असा टोला त्यांनी लगावला. दरम्यान या प्रश्नावर आता वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाणार आहे.