राज्य

पंकजा मुंडेंनी नाराजी लपवत दिला समंजसपणाचा परिचय ! मनात दडलयं काय ? वाट पाहावी लागणार..

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना अगोदर काही दिवस बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळणार अशी खात्रीलायक वृत्त येत होती. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. महाराष्ट्रातून चारजणांना संधी मिळाली यात राज्यसभा खासदार भागवत कराड यांचा समावेश आहे. दरम्यान मुंडे यांना याही संधीपासून वंचित ठेवण्यात आल्याने सहाजिकच त्यांचे समर्थक नाराज आहेत. यावर खुलासा करण्यासाठी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली यात त्यांनी भारतीय जनता पक्षावर आपण नाराज नसल्याचे सतत सांगत वेळ मारून नेली असली तरी त्या बोलताना मध्येच भावूक देखील झाल्या. पंकजाताईंनी पत्रकारांसमोर कोणतीही नाराजी दाखवायचीच नाही असा मनाशी खुणगाठ मारली होती. अत्यंत सावधपणे त्या बोलत होत्या.
पंकजा मुंडे या विधानसभेला पराभूत झाल्यानंतर त्यांना विधानपरिषदेला संधी मिळेल असा समर्थकांचा अंदाज होता पण तो फोल ठरला. त्यावेळी रमेशआप्पा कराड यांना संधी मिळाली तर राज्यसभेच्या जागा भरताना डॉ. भागवत कराड यांची निवड भाजपाच्या श्रेष्ठींनी केली. सहाजिकच यामुळे मुंडे या नाराज आहेत. त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत वारंवार विधानपरिषद व राज्यसभेचा उल्लेख करून पक्षाने नवीन लोकांना या जागांवर संधी दिल्याने पक्ष विस्तारेल असे सांगितले. याचबरोबर केंद्रात जे चार नवीन मंत्री घेण्यात आले आहेत यामुळेही पक्षाला फायदा होईल असा वरिष्ठ नेत्यांचा अंदाज असल्यानेच त्यांना निवडले गेले असेल हे सांगण्यासही त्या विसरल्या नाहीत. याचवेळी त्यांनी आपल्या वडिलांनी म्हणजेच स्व. गोपीनाथ मुंडे यांनी भाजपा राज्यात कसा वाढविला यावरही प्रकाशझोत टाकला. तसेच आपण नेता असल्याने सर्वांना बरोबर घेवून जाणे हे काम आहे. यासाठी त्यांनी नवीन मंत्र्यांना शुभेच्छाही दिल्या तसेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी केंद्र पातळीवर प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांना केले.
पंकजा मुंडे यांना वारंवार पत्रकारांनी तुम्ही नाराज आहात का? असे विचारले असता त्यांनी मुरब्बी राजकारण्यांप्रमाणे याची उत्तर देत भारतीय जनता पक्ष व श्रेष्ठी यांच्याबाबत एकही नाराजीचे अक्षर उच्चारले नाही. उलट श्रेष्ठींनी काहीतरी विचार करूनच चार मंत्री महाराष्ट्रातून निवडल्याचे सांगितले. यामुळे सहाजिकच त्यांनी ठरवूनच ही उत्तर दिली हे निश्‍चित दिसत होते. खासदार प्रीतम मुुंडे या मंत्रिपदासाठी कशा योग्य होत्या यावरही त्यांनी चर्चा केली. यावेळी मुंडे यांनी काही शब्द खास पध्दतीने वापरले. त्या म्हणाल्या, भारतीय जनता पक्षात मी पणा अजिबात चालत नाही. येथे आम्ही, आपण, आपण सगळे असे संबोधण्याची प्रथा आहे. आता हे त्या का बोलल्या..समझने वालो को इशारा भी काफी है।
पंकजा मुंडे यांनी या पत्रकार परिषदेत एक वाक्य वापरले. त्या म्हणाल्या, माझ्या वडिलांनी म्हणजेच स्व. गोपीनाथ मुंडे यांनी जीवनात सतत संघर्ष केला होता. तोच वारसाहक्काने मला मिळाला आहे..मला ही सतत संघर्ष करावा लागत आहे. माझे पुनर्वसन करा असे मी कुणाला म्हंटलेले नाही आणि पुनर्वसन कोणाचे करतात ज्यांचे सर्व संपले आहे त्यांचे..माझे काय संपले आहे..? हे सांगताना त्यांनी आपण नेता , मास लीडर असल्याची जाणीव सर्वांना करून दिली. मी एका समाजासाठी मी काम करत नसून सर्वांनाच बरोबर घेवून जात असल्याचे स्पष्ट केले. राज्यभरात सर्वांसाठी सर्वाधिक सभा घेतल्याचे त्या म्हणाल्या. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्याकडूनच आपण राजकारण व समाजकारणाचे धडे गिरविल्याने आपणाकडे नेतृत्व, वर्क्तृत्व व कर्तृत्व हे गुण आल्याचे त्यांनी आठवण यावेळी करून दिली. हे सांगताना त्या भावूक ही झाल्या होत्या.
सध्या राज्य भाजपात देवेंद्र फडणवीस यांचा शब्द अंतिम मानला जात असून त्यांनी पक्षाअंतर्गत ही अनेक निर्णय घेवून बर्‍याच नेत्यांना धक्के दिले आहेत. यातूनच पंकजा मुंडे यांना अनेक पदांपासून दूर ठेवल्याची चर्चा आहे. पक्षात मुख्यमंत्रीपदाचे जे दावेदार आहेत त्यांचे खच्चीकरण केले जाते असा आरोप नेहमीच फडणवीस यांच्यावर केला जातो. यापूर्वी एकनाथ खडसे यांनीही याच मुद्द्यावर पक्ष सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
दरम्यान आज शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या सामनामध्ये देखील प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न देता भाजपाने मुंडे भगिनींवर कसा अन्याय केला हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत पत्रकारांनी पंकजाताई यांना विचारले असता त्या म्हणाल्या, ते ( खासदार संजय राऊत) खूप हुशार आहेत. त्यांना खूप माहिती असते. यामुळे त्यांनी लिहिले असले पण मी तो अग्रलेख वाचलेला नाही. याच बरोबर आपली राऊत यांच्याशी दूरध्वनीवरूनही काहीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी एका पत्रकाराच्या प्रश्‍नावर स्पष्टीकरणही दिले.
पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे यांनी खा.प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न मिळाल्याने आपण नाराज नसल्याचे दाखविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. तसेच समर्थकांमध्ये नाराजी असल्याचे मान्य करून त्यांना समजावून कसे सांगायचे ते पाहते असे ही त्यांनी म्हणाल्या. त्यांनी राज्य व केंद्रीय भाजपाच्या नेतृत्वाबद्दल जे प्रश्‍न विचारले गेले यावर आटोपशीर उत्तर देत एखादाही चुकीचा शब्द जावू नये याची खबरदारी घेतल्याचे दिसत होते.  यावरूनच त्या आपली पुढील दिशा अत्यंत विचारपूर्वक घेत असल्याचे जाणवते. नाराजी जाहीरपणे व्यक्त न करणे हे राजकारणात मुरब्बीपणाचे लक्षण मानले जाते. कारण शब्दांनी माणस दुखावतात व शह काटशहाचे राजकारण आणखी वाढते. यासाठी शांत राहून योग्य वेळेची संधी शोधणे हाच एकमेव मार्ग राजकारणात सरळ मानला जातो. आता पंकजाताई पुढील काळात काय निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण आजतरी त्यांनी औपचारिक पत्रकार परिषद घेवून आपण भाजपात नाराज नाही असे दाखवून दिले आहे. 

Header

Related Articles

Back to top button
Close
Close