31 दिवसानंतर प्रशासन आले आंदोलनस्थळी मात्र चर्चा निष्फळ, अकलूजमधील उपोषण सुरूच
अकलूज – सुमारे ३२ दिवसापासून नगरपरिषद व नगरपंचायत स्थापनेच्या माणगीसाठी अकलूज येथे उपोषणास बसलेल्या अकलूज-माळेवाडी व नातेपुतेच्या ग्रामस्थांना भेटण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव आले. त्यांनी उपोषणकर्त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. परंतु मागण्या मंजूर होईपर्यंत साखळी उपोषण सुरुच राहिल, असे धैर्यशील मोहिते पाटील, उपसरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्यासह नागरिकांनी सांगितल्यानंतर प्रशासकीय अधिकारी रिकाम्या हाताने माघारी गेले.
यावेळी उपोषण शकर्त्यांशी चर्चेदरम्यान संजीवव जाधव यांनी विनंती केली की, आपण न्याय मागण्यासाठी उच्च न्यायालयात गेला आहात. न्यायालयाने शासनास तीन आठवड्यांची मुदतही दिली आहे. येत्या काही दिवसांमध्ये शासन आपला निर्णय न्यायालयास कळवेलच. तेव्हा आपण उपोषण सोडावे. यावेळी धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, उपोषणाचा निर्णय तीन गावच्या नागरिकांचा आहे. न्यायालयातून आम्हाला न्याय मिळेलच. तत्पूर्वी आपण आम्हाला उपोषण सोडण्यास सांगता आहात. आपण आम्हाला ठोस निर्णय देणार आहात का? सकारात्मक निर्णय मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरुच राहिल.
तीन गावच्या नागरिकांचे गत ३१ दिवसांपासून उपोषण सुरु आहे. या काळात शासनाचा एकही प्रतिनिधी उपोषणस्थळाकडे फिरकला नाही. नगर विकासमंत्री भेटीस आलेल्या शिष्टमंडळास म्हणतात, आम्ही निर्णयाच्या बाजूने सकारात्मक आहोत तर न्यायालयात मात्र नगरविकास खाते अकलूजच्या प्रस्तावात त्रुटी असल्याचे सांगते. त्यामुळे यामध्ये राजकारण असल्याचे स्पष्ट दिसते. न्यायालयाने दिलेल्या मुदतीनंतर शासन अकलूज नगरपरिषद करण्यासंदर्भात होकारही कळवू शकते किंवा आणखी काही त्रुटी उपस्थित करुन नकारही कळवू शकते. किंवा आणखी काही पळवाट शोधून निर्णय देण्यासाठी मुदत वाढही मागू शकते. अशावेळी तीन गावच्या नागरिकांनी ऊन, पाऊस, वारा सोसून तसेच कामधंदा बंद ठेऊन सुरु ठेवलेले उपोषण कोणत्याही ठोस निर्णयाशिवाय मध्येच सोडणे नागरिकांना उचित वाटले नाही. त्यामुळे उपोषण सुरुच ठेवण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. असे यावेळी आंदोलकांनी सांगितले.