राज्य

निवडणुकांची तयारी: राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींची प्रारूप प्रभाग रचना करण्याची निवडणूक आयोगाची सूचना


मुंबई- राज्यात डिसेंबर 2019 ते फेब्रुवारी 2022 दरम्यान पंचवार्षिक मुदत संपणार्‍या  तसेच नव्याने स्थापित झालेल्या नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने केल्या आहेत. यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये आता निवडणूक घेण्याच्या हालचालींना वेग येणार असून यात नव्याने स्थापन झालेल्या अकलूजसह चार शहरांचा समावेश आहे.
राज्याच्या निवडणूक आयोगाने 20 ऑगस्ट 2019 रोजी शासन परिपत्रक काढत राज्यातील सर्व  जिल्हाधिकार्‍यांना सूचना केल्या आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील पूर्वीच्या बारा आणि नव्याने स्थापित झालेल्या चार नगरपरिषद, नगरपंचायतींचा समावेश आहे. यात बार्शी, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, अक्कलकोट, मैंदर्गी, दुधनी, कुर्डूवाडी, करमाळा, माढा, माळशिरस, मोहोळ  या 12 अगोदरच्या आणि नवनिर्मित वैराग, नातेपुते, अकलूज, महाळुंग-श्रीपूर या 16 नगरपरिषद व पंचायतींचा समावेश आहे.
डिसेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 या कालावधीतील मुदती संपणार्‍या नगरपरिषदा / नगरपंचायतींची व्यापकता विचारात घेता प्रभाग रचना वेळेवर अंतिम करणे सुकर व्हावे म्हणून प्रारुप प्रभाग रचनेची कार्यवाही सुरु करणे आवश्यक असल्याचे निवडणूक आयोगाने म्हंटले आहे. नगर परिषद / नगर पंचायतीच्या मागील सार्वत्रिक निवडणूकीनंतर अधिसूचनेन्वये हददीत झालेले बदल,क्षेत्र समाविष्ट करणे अथवा वगळणे, विविध विकासकामे/योजनांमुळे झालेले भौगोलिक बदल उदा. नवीन रस्ते, पूल, इमारती इत्यादी विचारात  घेऊन. नवनिर्मित नगर परिषदा/नगर पंचायतींनी अधिसूचनेनुसार त्यांचे क्षेत्र निश्‍चित करून नकाशे तयार करावेत, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
दरम्यान सध्या कोरोनाचा काळ सुरू असल्याने नगरपरिषद निवडणुकांचे काय होणार याकडे सार्‍या राज्याचे लक्ष लागले होते. मात्र निवडणूक आयोगाने आता पंचवार्षिक निवडणुकांसाठी प्रारूप आराखडे तयार करण्याचे आदेश दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यात नव्याने तीन नगरपंचायती स्थापन झाल्या आहेत. यात नातेपुते, महाळुंग श्रीपूर व वैरागचा समावेश आहे. तर अकलूज नगरपरिषद झाली आहे. यामुळे येथेही आता प्रभाग रचना होत असून या अन्य पालिकांसमवेत निवडणुका घेण्याचा त्यांचाही मार्ग मोकळा झाला आहे.

Header

Related Articles

Back to top button
Close
Close