विशेष

जाणून घ्या : मुंबई – हैद्राबाद बुलेट ट्रेन प्रकल्प कसा आहे ?, संभाव्य मार्गावरील गावात सध्या याबाबत खूप चर्चा असल्याने मत-मतांतरच खूप आहेत..

पंढरपूर –  केंद्रातील भारतीय जनता पक्षप्रणित नरेंद्र मोदी सरकारकडून देशाच्या प्रगतीसाठी विविध भागाला द्रुतगती रेल्वेने जोडण्याचा मानस असून यासाठी आठ मार्गांवर बुलेट ट्रेन सुरू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. यापैकी एक मुंबई- हैद्राबाद प्रकल्प असून याच्या विविध सर्व्हेक्षणाचे काम सध्या सुरू आहे. दरम्यान ही योजना अंतिम स्वरूपात कशी असणार? याबाबत सर्व सर्व्हेक्षण पूर्ण झाल्यानंतरच अधिकृत माहिती मिळू शकणार आहे. मात्र सध्या या मार्गावरील गाव व शहरांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
केंद्र सरकारने हायस्पीड रेल कार्पोरेशनच्या माध्यमातून मुंबई- अहमदाबाद , दिल्ली-वाराणसी, दिल्ली अहमदाबाद, दिल्ली-अमृतसर, मुंबई- नागपूर, चेन्नई- मैसूर, मुंबई – हैद्राबाद व वाराणसी- हावडा या आठ मार्गावर बुलेट ट्रेन चालविण्याचा आपला निर्णय जाहीर केला आहे. मुंबई- अहमदाबाद ही योजनेचे काम सुरू आहे. 2019 आणखी  सहा मार्गांची घोषणा झाली व यात मुंबई- हैद्राबादचा समावेश आहे. 2020 मध्ये या मार्गावर सर्व्हेक्षणास सुरूवात झाली. मुंबई- नवी मुंबई- पुणे- सोलापूर- कलबुर्गी- तेलंगणा असा याचा मार्ग असून सुरूवातीला 767 किलोमीटरची लांबी होती मात्र ती कमी होवून 711 किलोमीटर असेल असा अंदाज आहे.
मोठी शहर एकमेकांना जोडण्याचा ही योजना असून मुंबईच्या वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सपासून याची सुरूवात होईल तर नवी मुंंबई विमानतळाजवळ ही याचे स्टेशन असू शकते. मुंबई, नवी मुंबई विमानतळ, पुणे, सोलापूर, कलबुर्गी,  हैद्राबाद  हा भाग जोडण्यासाठी ही बुलेट ट्रेनचे काम होत असून यात पुणे व हैद्राबाद ही मोठी आयटी पार्क शहर आहेत. तर मुंबई व हैद्राबाद मार्गावर ही प्रवास करणार्‍यांची संख्या मोठी आहे. यासाठी हवाई सेवा सतत उपलब्ध होत नसल्याने ही बुलेट ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. नवी दिल्ली व मुंबई ही देशाची दोन सर्वात मोठी व औद्योगिक प्रगत शहर असून त्यांना अन्य शहरांशी बुलेट ट्रेनच्या माध्यमातून जोडले जात आहे.
मुंबई- हैद्राबाद हा बुलेट ट्रेन मार्ग विविध शहरांना जोडताना तो मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे, राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारून जात आहे.
असे मोठे प्रकल्प सुरू करताना अनेक प्रकारचे सर्व्हेक्षण होत असते यातही ते सध्या सुरू असून मार्गाचा डीपीआर तयार करणे, या बुलेट ट्रेन मार्गावरील संभाव्य ट्राफिक सर्व्हे म्हणजे किती प्रवासी मिळू शकतात यासह हा मार्ग विविध भागातून जात असल्याने याची संपूर्ण आखणी तसेच जीएडीस म्हणजे जनरल अलाईंगमेंट सर्व्हे, आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी हवाई सर्व्हेक्षण ज्यास लिडार सर्व्हे असे संबोधले जाते व याबरोबर या मार्गावरील जमिनीवरील, जमिनीखालील बाबींचा सर्व्हे तसेच ऊर्जा मिळविण्यासाठीचे मार्ग याचे सर्व्हेक्षण ही महत्वाचे मानले जाते. मार्गावर सामाजिक सर्व्हेक्षण हे अत्यंत महत्वाचे असून यात संभाव्य बाधितांची आर्थिक स्थिती पाहिली जाते व याचा अभ्यास केला जातो. पर्यावरणावर या योजनेचा काय फरक पडू शकतो याचाही सर्व्हे केला जातो.  यासाठी सध्या मुंबई – हैद्राबाद बुलेट ट्रेन मार्गावर विविध एजन्सीज काम करत असून निविदा काढून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई- हैद्राबाद बुलेट ट्रेन मार्गाचे जवळपास सर्व सर्व्हेक्षण होत आली असून सध्या सामाजिक सर्व्हेक्षण सुरू आहे. या मार्गाची निश्‍चिती झाली असून बाधितांची माहिती संकलित झाली आहे. केंद्र सरकारची ही महत्वकांक्षी योजना असल्याने ती राबविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. ही बुलेट ट्रेन जास्तीत जास्त 350 किलोमीटर प्रतितास वेगाने धावू शकते तर तिचा निश्‍चित वेग हा 320 कि.मी. प्रतितास तर सरासरी 250 कि.मी. प्रतितास वेगाने धावते.  या गाडीत जास्तीत जास्त एकावेळी 750 प्रवासी बसू शकतात. ही अत्याधुनिक प्रणालीवर चालणारी गाडी असून यात अति संवेदनाशील  भूकंपाबाबत माहिती देणारी व लगेच अलार्म करणारी यासह भूकंप आल्यास तत्काळ ब्रेक लावण्याची यंत्रणा असते.
दरम्यान राज्यात विविध राष्ट्रीय महामार्ग तसेच समृध्दी महामार्गासारखे प्रकल्प राबविले जात आहेत. सोलापूर जिल्ह्यातही महामार्गांचे जाळे  विणले जात असून यात बाधित शेतकर्‍यांना चांगला मोबदला मिळाला आहे. यामुळेच बुलेट टे्रनबाबत ही खूप उत्सुकता आहे. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर, मोहोळ, उत्तर व दक्षिण सोलापूर तसेच अक्कलकोट तालुक्यातील 62 गावातून हा मार्ग जात असल्याने यात 14 हजार 642 शेतकर्‍यांच्या जमिनी जाण्याची शक्यता असल्याने येथेही मोबदल्याची चर्चा रंंगत आहे. महामार्गाप्रमाणे समाधानकारक नुकसान भरपाईची मागणी आहे. सध्या सुरू असलेले सामाजिक सर्व्हेक्षण संपल्यानंतर याचा अभ्यास करून याबाबत निर्णय होतील अशी अपेक्षा आहे. सध्या हा प्रकल्प केवळ सर्व्हेक्षणात आहे. याची घोषणा केंद्रीय स्तरावरून झाली असल्याने तो राबविला जाणार हे निश्‍चित आहे. या योजनेसाठी लागणारा अंदाजे खर्च याचाही अभ्यास सध्या सुरू आहे. यामुळे जोवर याबाबत अधिकृत माहिती संबंधित विभागाकडून दिली जात नाही तोवर भाष्य करणे योग्य नाही असे वाटते. सध्या सर्व्हेक्षणाची कामे वेगाने पूर्ण होत असल्याने लवकरच योजनेचा आराखडा जनतेसमोर येईल असे दिसते. 

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close