राज्य

मुंबई – हैद्राबाद बुलेट ट्रेन : एका बाजूला जनसुनावणी तर दुसरीकडे मार्ग बदलण्यावरून वाद आणि संभ्रम


मुंबई-हैदराबाद ही बुलेट ट्रेन सोलापूरमार्गेेच धावणार असून यासाठी आता जनसुनावणी सुरू झाली असून ठाण्यानंतर सोलापूरमध्ये ही याबाबतची प्रक्रिया राबविली जात आहे. हा मार्ग 649 किलोमीटरचा मार्ग निश्‍चित होवून सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे व आता अंतिम आराखडा तयार होत असताना मुख्यमंत्र्यांनी हैद्राबाद गाडी मराठवाड्यातून नेण्याची जी मागणी पंतप्रधानांकडे केली आहे याचा संदर्भ घेत भाजपाचे नेते आक्रमक झाले आहेत. यातून आता पत्रकाबाजीचे वाद वाढत असल्याने या मार्गावरील गावांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.
मंबई- हैद्राबाद बुलेट ट्रेन ही मुंबई, ठाणे, पुणे, सोलापूर व कुलबर्गी मार्गे हैद्राबाद अशी धावणार असून याचे सर्व्हेक्षण झाले आहे व आता याठीचा अंतिम आराखडा तयार होत आहे. ठाणे जिल्ह्यात जनसुनावणी सुरू असून ती आता सोलापूरला ही जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली आहे. या मार्गावरील सोलापूर जिल्ह्यातील 62 गावांमधील जागा बाधितांशी चर्चा होत आहे. अशा स्थितीत मुख्यमंत्र्यांनी मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रेल्वे संदर्भात पत्र दिले होते यात हैद्राबाद हासस्पीड रेल्वे मराठवाड्यातून नेण्याची मागणी होती. तत्पूर्वी महाविकास आघाडीतील मंत्री अशोक चव्हाण यांनीही अशीच मागणी केली होती.
दरम्यान या बुलेट ट्रेनसाठी प्रयत्न करणारे भाजपाचे माढा  व सोलापूरचे दोन्ही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व जयसिध्देश्‍वर महास्वामी हे यांनी आक्रमक होत रेल्वे ठरलेल्या मार्गावरूनच धावेल असे स्पष्ट केले आहे. तसेच याबाबत हे खासदारद्वय पंतप्रधानांना ही आपल्या भावना कळविणार आहेत. दरम्यान हायस्पीड रेल कार्पोरेशनने कोट्यवधी रूपये खर्च करून सर्व्हेक्षण पूर्ण केले आहे. यासाठी एजन्सीज काम करत असून वर्षभरात आराखडा तयार होवून पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नातील बुलेट ट्रेन मार्गाच्या बांधणीचे कामही सुरू होणार आहे. अशात मार्ग बदलण्याची मागणी झाली असली तरी यावर कितपत केंद्र सरकार विचार करेल हे सांगणे कठीण आहे. मुंंबई, पुणे व हैद्राबाद ही औद्योगिक व आयटी शहर जोडणारा हा प्रकल्प आहे. यामुळे यात बदल शक्य नसल्याचे स्पष्ट होत आहे.
याच्या जनसुनावणीला सोलापुरात सुरूवात झाली असून पुढील पंधरा दिवसानंतर बाधित शेतकर्‍यांशी संवाद साधून याविषयीची त्यांची मते जाणून घेण्यात येणार आहेत. भूसंपादनाबाबत हायस्पीड रेल कॉर्पोरेशनकडून प्रस्ताव आल्यानंतर तत्काळ त्याचे काम पूर्ण करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे.  गुरुवारी, जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली बुलेट ट्रेनच्या उभारणीनंतर होणार्‍या पर्यावरणीय, सामाजिक व आर्थिक परिणामांचा विचार करण्यासाठी जनसुनावणी झाली. यावेळी खासदार डॉ. जयसिध्देश्‍वर शिवाचार्य महास्वामी, आमदार सुभाष देशमुख, सहायक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे, भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड, प्रांताधिकारी हेमंत निकम, भूमिअभिलेख विभागाचे अधीक्षक हेमंत सानप, अपर्णा कांबळे, कल्याण जाधव उपस्थित होते. मुंबई ते हैदराबाद या बुलेट ट्रेनचा एकूण 649.76 किलोमीटर मार्ग असणार आहे. त्यापैकी सोलापूर जिल्ह्यातून 170 किलोमीटर मार्ग जाणार आहे. त्यासाठी माळशिरस, पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या सहा तालुक्यातील 62 गावांतून ही बुलेट ट्रेन जाणार आहे. त्यासाठी 317.97 हेक्टर जमिनीचे संपादन खासगी वाटाघाटी किंवा नव्या भूसंपादन कायद्यानुसार होईल. सद्यःस्थितीत नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनकडून त्यासाठीचा डीपीआर तयार करण्यात येत आहे. तो पूर्ण होण्यास साधारणत: दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे. हायस्पीड रेलकडून भूसंपादनाचा प्रस्ताव आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे भूसंपादन विभागाच्या समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी अरुणा गायकवाड यांनी सांगितले.
नियोजित मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेनसाठी सोलापूरमार्गेच सर्व्हे करण्यात आला आहे. हा मार्ग योग्य असून तोच कायम असावा, अशी मागणी सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील सोलापूर हा औद्योगिक जिल्हा राज्यातील महत्त्वाचा जिल्हा आहे. भविष्यात उद्योग व रोजगार वाढीस सोलापुरातच वाव आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. 

Header

Related Articles

Back to top button
Close
Close