कार्तिकी यात्रा भरवा नाहीतर यावर अवलंबून सर्व घटकांना आर्थिक मदत द्या..अन्यथा तीव्र आंदोलन , मनसे नेते दिलीप धोत्रे यांचा इशारा
पंढरपूर – मागील जवळपास दीड वर्षाहून अधिक काळ कोरोनामुळे पंढरपूरमध्ये भरणार्या कोणत्याही यात्रा झालेल्या नाहीत. आता संसर्ग अत्यंत कमी झाला असून सर्व व्यवहार देशभरात सुरळीत झाल्याने यंदाची कार्तिकी यात्रा भरविण्यास परवानगी द्यावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी दिला आहे. जर शासनाने परवानगी दिली नाही व निर्बंध लादले तर येथे यात्रेवर अवलंबून असणार्या सर्व घटकांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कोरोनाकाळात मार्च 2020 पासून पंढरपूरचे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर बंद होते. मध्यंतरीच्या काळात नोव्हेंबर 2020 मध्ये ते सुरू झाले व मुखदर्शनाची सोय करण्यात आली होती मात्र नंतर संसर्ग वाढल्याने ते बंद ठेवण्यात आले होते. आता संसर्ग कमी झाल्याने व सर्व व्यवहार सुरळीत असल्याने मंदिरात रोज दहा हजार लोकांना मुखदर्शनाची सोय करण्यात आली आहे. मागील एकोणीस महिन्यात कोणतीही यात्रा पंढरपूरला भरलेली नाही. हे शहर व आजुबाजूचा परिसर मंदिरावर उपजीविका करणारा असून येथील व्यापार्यांनी यापूर्वी भरलेला माल सततचे निर्बंध व लॉकडाऊन यामुळे खराब झाला व यामुळे लहान मोठ्या व्यापार्यांचे खूप नुकसान झाले. येथे रस्त्यावर बसून व्यवसाय करणार्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. याचबरोबर रिक्षा व टांगेचालक ही आर्थिक संकटात सापडले आहेत.
पंढरपूरच्या अर्थकारणाचा कणा असणार्या आषाढी,कार्तिकी, चैत्री , माघी या यात्राकाळात पंढरीत निर्बंध लादले जातात व भाविकांना रोखले जाते. आता ही नोव्हेंबर 2021 मध्ये होणार्या कार्तिकी यात्रेबाबत प्रशासनाची भूमिका स्पष्ट नाही. मंदिर समितीच्या बैठकीनंतर यावर निर्णय घेवू असे जिल्हाधिकारी सांगत आहेत. सध्या सर्व कामकाज सुरळीत आहे. सर्व अनलॉक झाले आहे. मुंबई सारख्या शहरातील रेल्वेला ही आता क्षमतेने चालविले जात आहे. यचा बरोबर देशातील तिरूपती बालाजी असो की ओडिशातील भगवान जगन्नाथ यासह कर्नाटकसह इतर राज्यातील सर्व प्रसिध्द मंदिर भाविकांनी खुली असताना गोरगरीब शेतकर्यांच्या श्री विठ्ठल मंदिरालाच सतत निर्बंधांच्या कचाट्यात का ठेवले जात आहे? असा सवाल दिलीप धोत्रे यांनी विचारला आहे.
मागील एकोणीस महिन्यात पंढरपूरचे अर्थकारण उद्ध्वस्त झाले असून अनेक व्यापारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मंदिर परिसरातील व्यापाराची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. आता मंदिर उघडल्याने काही प्रमाणात भाविक येत असल्याने थोडा दिलासा मिळत असतानाच प्रशासनाने कार्तिकी यात्रा रद्द करू नये, अशी मागणी धोत्रे यांनी केली आहे. येथे कोरोनाकाळात विधानसभेची पोटनिवडणूक झाली मात्र मंदिर व व्यापार बंद अशी विचित्र स्थिती होती. आता कोरोना कमी झाला आहे, तसेच लसीकरण ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. भाविक ही आरोग्याप्रती जागरूक असून ते आपली काळजी घेण्यास आता सक्षम आहेत व जनजागृतीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. यामुळे कार्तिकी यात्रा भरविण्यास परवानगी द्यावी. व्यापार्यांनी ही व्यवहार सुरळीत होत असल्याने कर्ज काढून माल भरलेला आहे , याचा विचार होणे गरजेचे आहे. असे दिलीप धोेत्रे म्हणाले.
दरम्यान 19 महिन्याच्या काळात मंदिर बंद राहिले होते तसेच सतत लॉकडाऊन होता मात्र शासनाने विठ्ठल मंदिरावर अवलंबून असणार्या घटकांना काहीही मदत केली नाही. पंढरपूर नगरपरिषदेने करात ही सवलत दिली नाही. व्यापार व व्यवसाय होत नसतानाही नागरिकांनी कर भरले, वीज बिले भरली आहेत. आता तरी पंढरपूरकरांच्या अर्थकारणाचा विचार करून कार्तिकी यात्रा भरवावी अन्यथा यात्रेवर अवलंबून असणार्या सर्व लहान मोठ्या व्यापार्यांना व घटकांना आर्थिक मदतीची घोषणा शासनाने अगोदर करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावरून आपला निषेध व्यक्त करेल असा इशारा मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिला आहे.
कोरोनाविषयक सर्व आरोग्याचे नियम पाळून कार्तिकी भरवावी तसेच वारकरी संप्रदायाच्या भावनेचाही विचार करावा असे मनसेने स्पष्ट केले आहे. हा संप्रदाय सोशिक असून त्यांनी आजवर शासनाला सहकार्यच केेले आहे. मात्र आता सर्व व्यवसहार सुरळीत असल्याने भाविक व देवाची भेट घडू द्यावी. यात प्रशासनाने आडकाठी बनू नये. असे आवाहन मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी केेले आहे
मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांची भेट घेवून दिलीप धोत्रे यांनी निवेदन दिले.यावेळी शशिकांत पाटील, सिद्धेश्वर गारड, अनिल बागल, गणेश पिंपळनेरकर,नागेश इंगोले, शुभम काकडे इत्यादी उपस्थित होते,