सभासद यादी घेवून सोमवारी हजर व्हा, सहकार शिरोमणी कारखान्यास प्रादेशिक सहसंचालकांचे आदेश
पंढरपूर- तब्बल सहावेळा लेखी आदेश देऊन देखील सभासद यादी न दिल्यामुळे तालुक्यातील भाळवणी येथील सहकार शिरोमणी साखर कारखान्यास सोलापूर विभागाचे प्रादेशिक सहसंचालक राजेंद्रकुमारे दराडे यांनी आता सोमवार १३ रोजी सभासद यादी घेवून हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे माजी संचालक दीपक पवार यांनी कारखान्याची सभासद यादी मिळावी, यासाठी २९ जून रोजी अर्ज केला होता. याबाबत वारंवार मागणी करून देखील कारखाना प्रशासनाने त्यांना सभासद यादी दिली नाही. यामुळे पवार यांनी प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्याकडे याबाबत तक्रार केली. या तक्रारीवर नुसार सहसंचालक कार्यालयाने कारखान्यास सभासद यादी देण्याची सूचना केली. यावरही त्यांनी कोणतीच कार्यवाही न केल्याने या प्रकरणी १३ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत सभासद यादी देणे बंधनकारक असल्याचे सूचित करण्यात आले. तीन दिवसात सदर यादी देण्याचे सूचित करूनही यावर कार्यवाही झाली नाही. विशेष म्हणजे १४ जुलै पासून २५ नोव्हेंबर पर्यंत सहा वेळा सदर यादी देण्याविषयी पत्र पाठवूनही कारखान्याने सभासद यादी पवार यांना दिली नाही. यामुळे प्रादेशिक सहसंचालक यांनी ही बाब सहकारी तत्वाशी सुसंगत नसल्याचे ताशेरे ओढले आहेत. तसेच सभासदांच्या बाबतीत नकारात्मक असल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान १३ डिसेंबर रोजी कारखान्याचे सभासद नमूना रजिस्टर आय व सभासद रजिस्टर नमुना जे घेवून प्रादेशिक कार्यालयात हजर राहण्याचे आदेश सहसंचालक दराडे यांनी कारखाना प्रशासनास दिले आहेत.