मुंबई बँक निवडणूक : मनसेची भूमिका राज ठाकरेंच्या आदेशानुसार सहकार विभाग प्रमुख दिलीप धोत्रे स्पष्ट करणार, गुरूवारी मुंबईत महत्वाची बैठक

मुंबई – आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बँक म्हणून ज्या संस्थेचा लौकिक आहे त्या मुंबई जिल्हा सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू असून यावर वर्चस्व असणार्या अध्यक्ष प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनलने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाठिंबा मागितला असून याबाबतचा निर्णय घेण्यासाठी ठाकरे यांनी मनसे नेते तथा सहकार सेनेचे प्रमुख दिलीप धोत्रे यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले आहे. उद्या गुरूवार 9 डिसेंबर रोजी याबाबत मुंबईत बैठक होईल, असे आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले.
मुंबई बँक या नावाने प्रसिध्द असणार्या या सहकारातील मोठ्या बँकेच्या निवडणुकीचे बिगूल वाजले असून मनसे या निवडणुकीत महत्वाची भूमिका पार पडू शकते, याची खात्री असल्यानेच भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या नवीन निवासस्थानी भेट घेतली. यावेळी या दोन नेत्यांमध्ये बराच काळ चर्चा झाली. याबाबत बोलताना आमदार लाड यांनी सांगितले की, राज ठाकरे यांनी या बँकेच्या निवडणुकीबाबत मनसेेने नेते दिलीप धोत्रे व रिटा गुप्ता यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले आहे. आज धोत्रे हे औरंगाबाद दौर्यावर असल्याने ते उद्या गुरूवारी मुंबईत येतील व बँकेचे अध्यक्ष तथा विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्याशी चर्चा करून मनसेची भूमिका सांगतील.
दरम्यान दिलीप धोत्रे हे गेल्या काही दिवसांपूर्वी मनसे नेते म्हणून नियुक्त असले तरी ते सहकारसेनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत. त्यांनी सहकाराबाबतची कार्यशाळा ही मुंबईत आयोजित केली होती. सहकारी साखर कारखानदारी व संस्थांपुढील समस्या तसेच सहकारातील स्वाहाकारावर ही आवाज उठविला आहे. अनेक संस्थांना मदत मिळवून देण्याासाठी ही पुढाकार घेतला आहे. याचबरोबर मनसेची पहिली ऊस परिषद लातूर जिल्ह्यात घेवून शेतकर्यांना न्याय देण्याची भूमिका पार पाडली.
धोत्रे हे राज ठाकरे यांचे विश्वासू मानले जातात. विद्यार्थी सेनेपासूनच ते त्यांच्याबरोबर काम करत आहेत. आता त्यांना पक्षाचे नेतेपद देण्यात आले आहे. धोेत्रे सध्या राज्यभर दौरा करून पक्षविस्ताराचे काम करत आहेत तसेच ते सहकार विभागातील प्रश्नांवर आवाज उठवून विभागवार सहकार आयुक्तांना भेटून चर्चा ही करत आहेत.
आता मुंबई बँकेच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी सहकारीतील मोठे नेते असणार्या प्रवीण दरेकर यांना दिलीप धोत्रे व रिटा गुप्ता यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले आहे. मुंबई बँकेची निवडणूक कोरोनाकाळ पाहता बिनविरोध व्हावी यासाठी आमदार लाड व दरेकर हे प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी शिवसेना, काँगे्रस व राष्ट्रवादी यांच्यशीही चर्चा केल्या आहेत. या बँकेच्या निवडणुकीत मनसे मोठा परिणाम करू शकते हे माहित असल्यानेच आमदार प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती.
दरम्यान आता मनसे नेते हे गुरूवारी मुंबईत जात असून ते प्रवीण दरेकर यांची भेट घेतील तसेच ते पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशीही चर्चा करतील असे दिसत आहे.
