पंचवीस हजाराहून अधिक जणांनी पाहिले शिवपुत्र संभाजी महाराज महानाट्य, आज शेवटचा प्रयोग
पंढरपूर – येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिजीत पाटील यांनी आयोजित केलेल्या शिवपुत्र संभाजी हे महानाट्य मागील चार दिवसात पंचवीस हजाराहून अधिक जणांनी पाहिले असून याचा अंतिम प्रयोग आज सोमवार (9 मे ) रोजी होत आहे. जिल्ह्यासह अन्य भागातील अनेक मान्यवरांनी या सोहळ्यास हजेरी लावली आहे.
5 ते 9 मे दरम्यान डीव्हीपी उद्योग समूहाचे प्रमुख अभिजीत पाटील यांनी या शिवपुत्र संभाजी महानाट्याचे मोफत प्रयोग पंढरपूरकरांसाठी आयोजित केले आहेत. यात स्थानिक कलाकारांनाही काम करण्याची संधी मिळाली असून छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका खासदार डॉ. अमोल कोल्हे हे साकारत आहेत. दरम्यान रविवारी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार समाधान आवताडे, माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, धनश्री परिवाराचे अध्यक्ष शिवाजीराव काळुंगे, जकराया साखर कारखान्याचे अध्यक्ष बिराप्पा जाधव, पंचायत समिती सदस्य धनराज शिंदे, उस्मानाबाद युवासेने नेते अतिश पाटील यांच्या उपस्थितीत महानाट्याचे उद्घाटन कण्यात आले.
अभिजित पाटील यांनी आयोजित केलेल्या महानाट्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास सर्वांच्या मनावर कोरला जाईल. या कार्यासाठी आपण पाटील यांचे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्यावतीने अभिनंदन करतो, असे वक्तव्य विजयसिंह मोहिते पाटील यांनी केले.
आमदार समाधान आवताडे यांनीही अभिजीत पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले. मागील दोन वर्षांपासून संपूर्ण देश हा कोरोनाने त्रस्त झाला होता. एकमेकांच्या गाठी ेटी बंद झाल्या होत्या. परंतु अभिजीत आबांनी या ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन करून सर्वांना एकत्रित आणण्याचे व घराघरात छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास पोहोचविण्याचे काम केले आहे, असे आवताडे म्हणाले.
पंढरपूर, सोलापूर नव्हेच तर संपूर्ण राज्यातून जवळपास पंचवीस हजारांपेक्षा जास्त शिवप्रेमींनी या ऐतिहासिक महानाट्याला उपस्थिती दर्शवितली आह. यास सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील विविध मान्यवरांनी हजेरी लावली आहे. या ऐतिहासिक महानाट्याचा सोमवारी शेवटचा प्रयोग असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन डीव्हीपी उद्योग समूहाचे प्रमुख अभिजीत पाटील यांनी केले आहे.