कार्तिकी यात्रेत वारकर्यांची सेवा करणार्या स्वेरीच्या विद्यार्थ्यांचा सन्मान
पंढरपूर- कार्तिकी वारीत प्रशासनाला मदत करत वारकर्यांची सेवा करणार्या गोपाळपूरच्या स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयातीयल विद्यार्थ्यांचा पंढरपूर पोलीस ठाण्याच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक अरूण फुगे म्हणाले, शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील विधायक कार्यामुळे ‘स्वेरी’ या शिक्षण संस्थेचे नाव मी फार पूर्वीपासून ऐकून होतो. पण पंढरपूर पोलीस स्टेशनचा कार्यभार हाती घेतल्यानंतर मात्र कार्तिकी वारीच्या निमित्ताने स्वेरीच्या कार्याला जवळून पाहता आले. स्वेरीच्या विद्यार्थ्यांची वारीतील कामगिरी ही फार मोलाची आहे. दर्शन रांगेतील वारकरी असो अथवा पंढरपूर शहरातील प्रत्येक महत्वाचा चौक असो, प्रत्येक ठिकाणी स्वेरीचे विद्यार्थी भक्तांना व गरजू नागरिकांना मदत करत होते. त्यांच्यात रुजलेली सहकार्याची भावना प्रशंसनीय आहे.
यावेळी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रे देवून सन्मानित करण्यात आले. प्रारंभी विद्यार्थी अधिष्ठाता व स्वेरी अभियांत्रिकीच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. महेश मठपती यांनी प्रास्ताविकातून प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी वारीच्या काळात केलेले सहकार्य तसेच निर्मल वारी, श्रमदान, प्रबोधनात्मक कार्यक्रम, आरोग्याची काळजी, स्वच्छतेविषयी मार्गदर्शन, वृक्षसंवर्धन, ग्राम स्वच्छतेचे महत्व, जनजागृती, पाणी व्यवस्थापन, शैक्षणिक प्रबोधन, शिक्षणाची गरज, लहान मुलांचे हक्क व सुरक्षितता तसेच संबंधित विविध विषयांवर प्रबोधनपर व ग्रामस्वच्छता विषयक कार्यक्रमांची माहिती दिली. वारी काळात दिलेल्या बहुमोल सहकार्याबद्धल पोलीस खात्याकडून स्वेरीचे आभार मानण्यात आले तसेच स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम. पवार यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी पो.ना.प्रसाद आवटे, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.दीप्ती तंबोळी यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. वैशाली मुचलंबे व प्रांजली उत्पात यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. यशपाल खेडकर यांनी आभार मानले.