फडणवीसांनी घोषणा केलेल्या कॉरिडॉरला विरोध : पंढरपूरकरांचा महिला व मुलांसह मोर्चा
पंढरपूर- १९०४ सालापासून श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर परिसरात तीनवेळा सामान्य नागरिकांची घरे ताब्यात घेवून विकासकामे करण्यात आली आहेत. आता चौथ्यांदा कॉरिडॉरच्या नावाखाली पुन्हा येथील नागरिकांना बेघर करण्याचा आराखडा तयार करण्यात आला असल्याचा आरोप मंदिर परिसर बचाव संघर्ष समितीचे प्रवक्ते रामकृष्ण महाराज वीर यांनी केला. यावेळी बाधित होणार्या नागरिकांनी महिला व लहान मुलांसह मोर्चा काढून प्रशासनास निवेदन दिले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर कॉरिडॉरची घोषणा केल्यापासून यास स्थानिकांनी विरोध सुरू केला आहे. यासाठी मंदिर परिसर बचाव संघर्ष समिती स्थापन करण्यात आली असून समितीच्या वतीने गुरूवारी येथील एक हजार नागरिकांच्या हरकती प्रांताधिकारी गजानन गुरव, नगरपरिषद मुख्याधिकारी अरविंद माळी यांना देण्यात आल्या. या मोर्चा मध्ये सर्व पक्षीय नेते व नगरसेवकांनी सहभागी होवून कॉरिडॉरला विरोध दर्शविला.
दरम्यान मोर्चाच्या सुरूवातीला संत नामदेव पायरी व संत चोखामेळा यांच्या समाधीचे दर्शन घेवून मंदिर परिसरातील कॉरिडॉर रद्द करावा असे विठ्ठल रूक्मिणीला साकडे घालण्यात आले. यानंतर मंदिर प्रदक्षिणा करून चौफाळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून पंढरपूर नगरपरिषद येथे आंदोलक दाखल झाले. आंदोलनात लहान मुलं, महिला, नागरिक व व्यापारी यांनी मोठी गर्दी केली होती. मंदिर परिसर बचाव समितीसह भाजपा, मनसे, राष्ट्रवादी कॉंग्रेस, उध्दव ठाकरे शिवसेना, एकनाथ शिंदे शिवसेना, समता परिषद, शहर विकास आघाडी, तीर्थक्षेत्र विकास आघाडी, हिंदू महासभा, मी वडार आदी पक्ष व संघटनेच्या पदाधिकार्यांनी कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी मोर्चात सहभाग घेतला होता.
निवेदन स्वीकारल्या नंतर प्रांताधिकारी गुरव यांनी, नागरिकांच्या तीव्र भावना शासनास कळविण्याचे आश्वासन दिले. तसेच सोमवार २१ रोजी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या समवेत आराखड्या संदर्भात बैठक असून येथे नागरिकांच्या सूचना मांडणार असल्याचे सांगितले.
आंदोलनात माजी नगराध्यक्षा साधना भोसले, मनसेचे नेते दिलीप धोत्रे, युवक नेते प्रणव परिचारक, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, शिवसेनेचे संजय घोडके, माजी नगरसेवक अनिल अभंगराव, विक्रम शिरसट, संग्राम अभ्यंकर, निलराज डोंबे, सुधीर धोत्रे, किरण घाडगे, महंमद उस्ताद, कोळी महासंघाचे अरूण कोळी, धनंजय कोताळकर, विवेक बेणारे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सत्यविजय मोहोळकर व मंदिर परिसर बचाव समितीचे अध्यक्ष नाना कवठेकर, प्रवक्ते रामकृष्ण महाराज वीर, बाबाराव महाजन, रा.पां.कटेकर, शैलेश बडवे, ऋषिकेश उत्पात, श्रीकांत हरिदास, गणेश लंके, साईनाथ बडवे, राजाभाऊ नलबिलवार, संजय झव्हेरी आदी सहभागी झाले होते.
बचाव समितीच्या विविध मागण्या यावेळी एक हजार नागरिकांनी पंढरपूर कॉरिडॉरसह मंदिर परिसरातील लहान बोळांमध्ये प्रस्तावित रूंदीकरणास विरोध दर्शविला. तसेच मंदिर परिसर बचाव समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनात दहा मुख्य मुद्दे मांडण्यात आले आहेत. यामध्ये १९०४ साली सध्याच्या ज्ञानेश्वर दर्शन मंडप साठी नागरिकांची घरे ताब्यात घेण्यात आली. यानंतर संत तुकाराम भवन, रूक्मिणी पटांगण येथील घरे ताब्यात घेण्यात आली तर १९८२ साली पन्नास ङ्गूट रूंदिकरण करण्यात आले. आता याच परिसरात कॉरिडॉर करण्याला विरोध केला. पंढरीत श्री विठ्ठल मंदिरासह येथील मठ, पुरातन वास्तू, परंपरा यांना देखील मोठे महत्व असून रूंदीकरणात यास बाधा होणार आहे. लहान गल्ली बोळांमुळे पूर्वी मंदिर विविध हल्ल्यातून सुरक्षित राहिले. आता अनेक रस्ते मोठे करून मंदिराची सुरक्षा धोक्यात येवू शकते. पंढरपूरच्या पैलतिरावर, ६५ एकर किंवा चंद्रभागेवर भव्य उड्डाणपूल उभारून कॉरिडॉर करावा. आदी मागण्या करण्यात आल्या. तसेच विकास कामाबाबत आम्ही देखील एक आराखडा बनविला असून तो विभागीय आयुक्त यांना दाखविण्यासाठी बैठकीचे आयोजन करावे अशी मागणी वीर महाराज यांनी केली.