Uncategorized

पंढरपूर अर्बन बँक निवडणूक :
परिचारक विरोधी आघाडीने सहकार निंबधकांकडे दाखल केले अपिल


पंढरपूर –  पंढरपूर अर्बन को- ऑप बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी प्रशांत परिचारक यांच्या गटासमोर आव्हानं उभे करण्याचा प्रयत्न करणार्‍या दिलीप धोत्रे प्रणित समविचारी आघाडीचे सर्व उमेदवारी अर्ज छाननीत नामंजूर झाल्यानंतर आता या उमेदवारांनी पुणे येथे सहकार निबंधकांकडे  अपिल केले असून याबाबत दोन दिवसात सुनावणी होवू शकते, अशी माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली.
अर्बन बँकेच्या निवडणुकीत यंदा परिचारक विरोधकांना एकत्र करत दिलीप धोत्रे यांनी सर्व सतरा जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र तीस हजार रूपयांचा शेअर्स व एक लाख डिपॉझिट ही अट पूर्ण होवू शकत नसल्याने सर्व उमेदवारी अर्ज सहाय्यक निंबधकांनी 28 डिसेंबर रोजी नामंजूर केले होते व याचा निकाल 29 रोजी जाहीर करण्यात आला. यानंतर सत्ताधारी परिचारक गटाने जल्लोष केला होता.
दरम्यान विरोधी गटाच्या अर्ज नामंजूर झालेल्या उमेदवारांनी पुणे येथे सहकार निबंधकांकडे  महाराष्ट्र सहकार कायदा  कलम 152 अन्वये अपिल दाखल केले असून यात त्यांनी बँकेने निवडणूक लढविण्यासाठीच्या पात्रतेसाठी शेअर्स रक्कम व डिपॉझिट वाढविण्याची जी उपविधी दुरूस्ती केली आहे ती कायदेशीर नसल्याचा दावा केला आहे. यातील कलम 40 अन्वये काही अटी जाचक असल्याचा दावा केला आहे. यामुळे या कलमाची पुर्तता न करणारे अर्ज नामंजूर झाल्याचे म्हंटले आहे. तसेच निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर  शेअर्स व डिपॉझिटची रक्कम  भरण्यासाठी अर्ज दिला गेला मात्र याचा स्वीकार न झाल्याचे या अपिलात नमूद करण्यात आले आहे. उपविधी दुरूस्ती करताना बँकेने सभासदांना वैयक्तिक नोटिसा देणे आवश्यक असल्याचे या उमेदवारांचे म्हणणे आहे. यामुळे पंढरपूरमध्ये निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी जे अर्ज फेटाळले आहेत ते बेकायदेशीर असल्याने ते मंजूर करण्याची मागणी या अर्जदारांनी केली आहे.
2 जानेवारी रोजी हे अपिल दाखल झाले असून यावर आता एक दोन दिवसात सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान 12 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. परिचारक गटाचा एक अर्ज जास्त आहे. त्यांनी अठरा अर्ज दाखल केले आहेत. येथे सतरा संचालकपदाच्या जागा आहेत. परिचारक गटाचे सर्व अर्ज मंजूर झाले आहेत. 

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close