राष्ट्रवादीतील फुटीनंतर काँग्रेस सोलापूर जिल्ह्यात आक्रमक , माढा व सोलापूर मतदारसंघावर सांगितला दावा
पंढरपूर – लोकसभा निवडणुकांची तयारी सार्याच राजकीय पक्षांनी सुरू केली असून काँग्रेस पक्षाने सोलापूर जिल्ह्यातील माढा आणि सोलापूर या दोन्ही मतदारसंघात आपले उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. राष्ट्रवादीमधील फुटीनंतर काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला असून माढ्यातून पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांना तर सोलापूरमधून आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्याची मागणी कार्यकर्ते व पदाधिकार्यांमधून होत आहे. याबाबत झालेल्या बैठकांमध्ये यावर विचारमंथन करण्यात आले.
सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा व शिंदे यांच्या शिवसेनेशी महायुती करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला हादरा दिला. यानंतर सोलापूर जिल्ह्यातील पक्षाशी निगडीत असणारे तीनही आमदार अजित पवार यांच्याबरोबर गेले आहेत. अशा स्थितीत आता काँग्रेस पक्ष येथे महाविकास आघाडीत थोरल्या भावाच्या भूमिकेत आला आहे. राज्यातही अशीच स्थिती असून विरोधी पक्ष नेतेपद ही काँग्रेसकडे गेले आहे. अशा परिस्थितीत इतके दिवस राष्ट्रवादीची दादागिरी सहन करणार्या काँगे्रस पक्षाने आता आपला पक्ष विस्तारण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून एकसंध काँग्रेस लोकसभा निवडणुकीत उमेदवार उतरविण्याच्या तयारीत आहेत.
मागील काही महिन्यांपूर्वी सोलापूर लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीने अधिकार सांगितला होता. यावरून आमदार प्रणिती शिंदे व राष्ट्रवादीचे युवा नेते आ. रोहित पवार यांच्यात शाब्दिक युध्द ही रंगले होते. सोलापूर मतदारसंघात सलग दोन वेळा काँगे्रस पराभूत झाल्याने येथे राष्ट्रवादी उमेदवार देण्याच्या भूमिकेत होती. मात्र आता पक्षात फूट पडल्यानंतर ते बॅकफूटला गेल्याचे चित्र आहे. याचवेळी काँग्रेसने सोलापूर जिल्ह्यात बैठका घेत माढ्यातून डॉ. धवलसिंह मोहिते पाटील तर सोलापूरमधून आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्याची मागणी सुरू केली आहे. अकलूजच्या बैठकीत मोहन जोशी, हुसेन दलवाई यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांसमोर कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी मोहिते पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. हा मतदारसंघ आघाडीत राष्ट्रवादीकडे असला तरी 2019 ला राष्ट्रवादीचा उमेदवार येथून पराभूत होत भाजपाला येथे विजय मिळाला होता.
सोलापूरची बैठक सोमवारी झाली असून येथून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्याची मागणी माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी केली असून या बैठकीस रमेश बागवे, धवलसिंह मोहिते पाटील, अॅड. धनाजी शिंदे यांच्यासह सोलापूर काँगेसचे सर्व पदाधिकारी व नेते उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा हा मतदारसंघ असून 2014 व 2019 ला मोदी लाटेत त्यांना येथे पराभव पत्करावा लागला होता. आता आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी द्यावी ,अशी मागणी जोर धरत आहे.
एकंदरीत काँग्रेस पक्षाचा आत्मविश्वास आता वाढला असून त्यांनी जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघावर हक्क सांगत उमेदवार ही निश्चित केल्याचे दिसत आहे. दरम्यान आता राष्ट्रवादी व उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेची भूमिका काय असणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.