राज्य

निर्मितीपासून उजनी धरण नवव्यांदा सरत्या 2023 या वर्षामध्ये नीचांकी भरले, नव्या वर्षात मायनसमध्ये जाणार


पंढरपूर –  सोलापूर जिल्ह्यासह जलाशयकाठच्या पुणे, अहमदनगर, धाराशिव या जिल्ह्यांसाठी वरदायिनी ठरलेले उजनी धरण निर्मितीनंतर 43 वर्षात  आजवर नऊवेळा शंभरीच्या आत आणि नीचांकी भरले आहे. यंदा 2023 मध्ये यात सर्वाधिक 60.66 टक्के जलसाठा हा 13 ऑक्टोंबर रोजी झाला होता. यानंतर पाणी सोडल्याने हे धरण आता उपयुक्त टक्केवारीच्या विशीत  पोहोचले आहे.
उजनी धरणाच्या निर्मितीपासून हे धरण बहुतांशवेळा शंभर टक्के अथवा क्षमतेने 110 टक्के भरत आले आहे. मात्र नऊ वर्षे यास नीचांकी स्थितीत राहावे लागले आहे. 2023 च्या पावसाळ्यात हे धरण 60 टक्के तरी भरले असल्याने रब्बीसाठी पाणी देता आले आहे. यापूर्वी 2002 -03 या वर्षात उजनी उपयुक्त पातळीत भरू शकली नव्हती. पावसाळ्यानंतर धरण वजा 7 टक्के अशा स्थितीत होते. यानंतर 2012-13 व 2015-16 या वर्षात धरणात कमी पाणीसाठा होवू शकला होता. येथे 16.28 व 14.60 टक्के अनुक्रमे उपयुक्त पातळीत पाणी साठू शकले होते.
उजनीच्या निर्मितीनंतर पहिल्यांदा शंभरीच्या आत धरण 1987-88 ल57ा टक्के भरले होते. यानंतर 1995-96 ला 57.81 टक्के तर 1999-2000 ला धरणात 43 टक्के पाणी साठू शकले होते. 2001 पासून सलग तीन वर्षे धरणात पाणी साठा कमी होता व दुष्काळाच्या झळा लाभक्षेत्राने सहन केल्या होत्या. 2000-2001 ला धरण 28.84 टक्के तर 2001-02 ला 43.15 व यानंतर 2002-03 ला वजा 7 टक्के अशा स्थितीत होते. हा काळ सोलापूर जिल्ह्यासह जलाशयकाठासाठी कसोटीचा होता. या काळात साखर कारखाने कमी असल्याने ऊस लागवड कमी होती.
 मात्र आता देशातील सर्वात जास्त साखर कारखाने असणारा सोलापूर जिल्हा असून येथे उजनी व निच्या पाण्यावर साखर कारखानदारीची भिस्त आहे. 2023 ला उजनी धरण 60 टक्के भरले होते. पाऊस कमी असल्याने भीमा नदीत पाणी सोडावे लागले असून सध्या कालवा व अन्य योजना सुरू असल्याने उजनीची टक्केवारी घसरून 20.50 टक्के अशी झाली आहे.
उजनी धरणावर जलाशयकाठासह सोलापूर जिल्ह्यातील शेती, साखर कारखाने, सहा औद्योगिक वसाहती , भीमा काठच्या सोलापूर महापालिकेसह अनेक नगरपरिषदा, पंढरपूर तीर्थक्षेत्र यासह नदीकाठाच्या गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. याच उजनीवर अनेक उपसा सिंचना योजना कार्यरत असून काहींची कामे प्रगतिपथावर आहेत. तर एकरूख योजनेची चाचणी होत आहे.
अलिकडच्या काळात सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त ऊस लागवड होवू लागली असून यंदा कमी पाऊस असल्याने बऱ्याच उसाचा चारा झाला आहे. यामुळे साखर कारखाने कमी दिवस चालणार हे निश्‍चित असून येत्या 2024 मध्येही लाभक्षेत्रात व जलाशयकाठी पाणीटंचार्इ जाणवणार आहे. कारण उपलब्ध पाणी आणखी एका आवर्तनानंतर कमी होवून धरणाचा प्रवास वजा पाणी पातळीत सुरू होणार आहे. उजनी नव्या वर्षात मायनस मध्ये जाणार आहे.  

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close