विशेष

दिंड्यांना अनुदान देण्यासाठी शासनाने मागविली यादी , आषाढी एकादशीपूर्वी अनुदानाचा चेक दिंडीचालकांच्या खात्यावर जमा होणार

पंढरपूर – राज्यातील मानाच्या दहा पालखी सोहळ्यातील १५०० दिंड्यांना प्रत्येकी २० हजार रुपये अनुदान देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष कार्य विभागाने पुण्याचे विभागीय आयुक्त यांच्याकडे संस्थानमार्फत यादी मागविण्यात आली आहे .

आषाढी एकादशीपूर्वी हा अनुदानाचा धनादेश दिंडीच्या किंवा दिंडी चालकांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रमुख अक्षय महाराज भोसले यांनी दिली .

वारकरी दिंडी सन्मान निधी प्रक्रिया सुलभ व सोपी असावी व रक्कम थेट लाभधारक दिंडी किंवा दिंडी चालक यांच्या नावावर जावी याबाबत अक्षय महाराज भोसले यांनी शासन दरबारी जोरदार प्रयत्न केले होते . पालखी सोहळ्या बरोबर चालणा -या असंख्य दिंड्या या परंपरेने चालत असल्यामुळे त्या धर्मादाय आयुक्तांकडे नोंदण्यात आलेल्या नाहीत . त्यामुळे शासनाने जरी अनुदान जाहीर केले असले तरी त्यांच्या कागदपत्रांची पुर्तता त्यांना करणे शक्य नसल्याने या दिंड्याना शासनाच्या अनुदानाचा प्रत्यक्ष लाभ मिळणे अशक्य होते . त्यामुळे हे अनुदान दिंडी चालकाच्या नावावर मिळावे अशी मागणी दिंडी चालकांनी केली होती . त्यानुसार अक्षय महाराज भोसले यांनी शासन दरबारी या दिंडी चालकांची भूमिका मांडली त्यानुसार शासनाने आज पहिल्या अध्यादेशात बदल करुन राज्य शासनाचे अवर सचिव प्रशांत वाघ यांच्या सहीने नवीन अध्यादेश जारी केला आहे . यात मानाच्या दहा पालख्यातील सुमारे १५०० दिंड्यांच्या नावावर किंवा नोंदणीकृत नसलेल्या दिंड्यांच्या चालकांच्या नावावर अनुदानाची २० हजार रुपये रक्कम जमा करण्यात येणार आहे .

या पालख्यातील दिंड्याना मिळणार अनुदान

संत ज्ञानेश्वर , संत तुकाराम , संत निवृत्तीनाथ , संत सोपानदेव , संत मुक्ताबाई , संत नामदेव , संत एकनाथ , संत चांगावटेश्वर , संत निळोबाराय व माता रुक्मिणी या अधिकृत मानाच्या पालखी सोहळ्यात चालणा-या सुमारे १५०० दिंड्यातील सुमारे दहा लाख वारक-यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे, असे ह भ प अक्षय महाराज भोसले म्हणाले . वारकरी हीत लक्षात घेऊन प्रक्रिया सुलभ असावी हा आग्रह शासनासमोर मांडला त्यास विभागीय आयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारा अनुमोदन देण्याचा निर्णय झाला व संस्थानकडून दिंड्यांची यादी मागविण्यात आली आहे . आषाढी एकादशी पूर्वी हा चेक दिंडीच्या किंवा दिंडी चालकाच्या बॅंक खात्यावर जमा करावा, असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे .

अशी असेल प्रक्रिया

शासनाद्वारे निर्देशित असणाऱ्या दहा मानाच्या पालखी सोहळ्यातील अधिकृत १५०० दिंड्यांची माहिती संस्थानकडून मागविण्यात आली आहे. त्यानुसार ज्या दिंडीकडे खाते नसेल त्या दिंडी प्रमुखाचे नाव ग्राह्य धरले जाईल जे की मंदिर , संस्थान दरबारी नोंदणी कृत असेल अथवा ते जे अधिकृत सांगतील त्या प्रमाणे कार्यवाही होईल. सदर दिंडीचे खाते असल्यास उत्तम नसेल तर दिंडी प्रमुखाच्या खात्यावर दिंडी नोंदणी नावानुसार निधी वर्ग करण्यात येईल. त्यासाठी दिंडी प्रमुखाचे अचूक खाते क्रमांक माहिती, बँक नाव, बँक शाखा नाव व आयएफएससी कोडं ही माहिती दिंडी प्रमुखांनी तत्काळ भरुन द्यावी . सर्व माहिती एकत्रित फॉर्म वर संकलन करुन शासना तर्फे त्या नावे अनुदानाच्या रकमेचा चेक देण्यात येणार आहे . दिंड्यानी आपली माहिती त्या त्या संस्थानकडे तत्काळ जमा करावी असे कळविण्यात आले आहे .

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close