पुन्हा पंढरपूर बनले ऊसदर आंदोलनाचे केंद्र, सर्वच संघटनांचा एकत्रित एल्गार
पंढरपूर- राज्यातील ऊसदर आंदोलनाचे केंद्र ज्याप्रमाणे कोल्हापूर व सांगली भागात होते तसे ते मागील काही वर्षापर्यंत पंढरपूर ही यात गणले जात होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फूट पडण्यापूर्वी सध्याचे रयत क्रांतीचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूरला आंदोलन व्हायची व दर जाहीर करूनच कारखाने सुरू व्हायचे. यात शेतकरी नेते राजू शेट्टी यांचाही सक्रिय सहभाग असायचा. मात्र नंतर ही आंदोलन थांबली होती , अनेक शेतकरी संघटना तयार झाल्या. मात्र आता पुन्हा 2022 ला सर्वच संघटनांच्या स्थानिक पदाधिकार्यांनी एकत्र येत रविवार 23 रोजी ऊस परिषद भरविली असून यात उसाच्या दराची मागणी होणार आहे.
सन 2004 च्या आसपास राजू शेट्टी यांनी पंढरपूर भागावर लक्ष केंद्रित केले होते. त्यांची ऊस परिषद जयसिंगपूर भागात होत असली तरी याचे पडसाद सोलापूर जिल्ह्यात उमटायचे. याच काळात जिल्ह्यात हळूहळू साखर कारखान्यांची संख्या वाढत होती. येथून शेट्टी व सदाभाऊ खोत यांनी ऊसदरासाठी पंढरपूर ते बारामती पायी वारी आंदोलनं ही केली. कोल्हापूर नंतर सोलापूर जिल्ह्यात ऊसदराची आंदोलन आक्रमकपणे राबविली जात होती. यातूनच सदाभाऊ खोत यांचे नेतृत्व या भागात उभा राहिले. आता राज्यात सर्वात जास्त साखर कारखाने असणारा हा सोलापूर जिल्हा आहे. मात्र ऊसदर नेहमीच कमी मिळतो असा आरोप शेतकरी संघटना करत आहेत. मध्यंतरी पडलेला दुष्काळ यानंतर अतिवृष्टी व कोरोनाचे संकट यानंतर आता या ऊस परिषदा पंढरपूर भागात पुन्हा सुरू होत आहेत. रविवारी सर्वच शेतकरी संघटनांनी एकत्र येत एल्गार पुकारला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ऊस दरवाढीसाठीच्या आंदोलनाची घोषणा पंढरपुरातील शिवाजी चौक (शिवतीर्थ) रविवार दि. 23 रोजी होणार्या ऊस परिषदेतून होणार आहे. शेतकरी घामाचा दाम मिळविण्यासाठी याठिकाणहून दंड थोपटणार आहे. राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्व शेतकरी संघटनांची ऊस दर संघर्ष समितीची स्थापना केली असून, त्यामाध्यमातून हा लढा उभारला जात असल्याची माहिती येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
उसाचा एकरी उत्पादन खर्च दरवर्षी वाढत असताना ऊसाला मात्र अपेक्षित दर मिळत नाही. तण नाशकाची किमंत महिन्यात 300 रूपयांनी वाढतात. तसा उसाला दर नाही वाढत. केंद्र सरकारने रिकव्हरी बेस हा 10.25 टक्के करून एफआरपी जाहीर केली. त्याचा फायदा ऊस उत्पादकांना होत नाही. रिकव्हरी चोरण्याचा प्रकार सुरू झाला आहे. यंदाच्या हंगामातील पहिला हप्ता आणि एकून ऊस दर जाहीर केल्याशिवाय ऊस गाळप हंगाम सुरू करू देणार असल्याचे यावेळी संघर्ष समितीच्या वतीने सांगण्यात आले. ऊस परिषदेेत शेतकर्यांच्या समवेत समोरासमोर चर्चा होऊन पहिली उचल तसेच पुढच्या आंदोलनाची दिशा ठरणार असल्याचे सांगण्यात आले. गेल्या आठ-दहा दिवसापासून जिल्ह्यातील विविध भागात शेतकरी पदाधिकारी यांच्या भेटी घेऊन ऊस परिषदेविषयी माहिती देण्यात येत आहे. त्या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले. यावेळी तानाजी बागल, सचिन पाटील, दीपक भोसले, समाधान फाटे, माऊली हळणवर, रणजीत बागल, माऊली जवळेकर, सचिन आटकळे, छगन पवार, विश्रांती भुसनर, बाळासाहेब जगदाळे आदी उपस्थित होतेे.
वर्गणी काढून खर्च
ऊस परिषदेसाठी प्रमुख पदाधिकारी तसेच ऊस उत्पादक शेतकर्यांकडून वर्गणी काढून खर्च केला जात आहे. प्रमुख पदाधिकार्यांनी प्रत्येकी दहा हजार रूपये वर्गणी दिली आहे. शेतकर्यांकडूनही वर्गणी येत आहेे. संघर्ष समितीमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न काही मंडळींकडून झाला, परंतु त्यात यश आले नाही. ऊस दरासाठीचा संघर्ष कायम राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले