19 दिवस झाले तरी शासनाला पाझर फुटेना..मामा पण भेटेनात.. आता सोमवारपासून अकलूजकरांचे अभिनव आंदोलन
अकलूज – अकलूज-माळेवाडी नगरपरिषद व नातेपुते नगरपंचायत व्हावी यासाठी गेले 19 दिवस झाले या तीन गावचे नागरिक कधी माळशिरसला तर आता आपआपल्या गावात आंदोलन करत आहेत. मात्र शासनाने या आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे. पालकमंत्री जिल्ह्याच्या दौर्यावर येतात पण आंदोलकांचे म्हणणे ही ऐकून घेत नाहीत. यामुळे सतत वेगवेगळी आंदोलन येथे होत आहे. आता सोमवारपासून अकलूजमधील शासकीय कार्यालयांमध्ये अधिकार्यांना जावू न देण्याचा चंग नागरिकांनी बांधला आहे.
मागण्यांसाठी येथील नागरिक न्यायालयात गेले आहेत. उच्च न्यायालयात यावर सुनावणी सुरू आहे. तर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासह 19 दिवस झालेले विविध प्रकारची आंदोलन रोज सुरू आहेत. मात्र शासन दखल घेण्यास तयार नाही. या प्रश्नी सध्या मोहिते पाटील विरूध्द राष्ट्रवादी असा सामना रंगला असल्याचे चित्र आहे. नगरपरिषद व नगरपंचायत स्थापन न होण्यामागे राष्ट्रवादी असल्याचा आरोप केला जात आहे. वास्तविक पाहता फडणवीस सरकारच्या काळात या गावांना नगरपरिषद व नगरपंचायत स्थापन करण्यास मान्यता मिळाली आहे.
याबाबत बोलताना भाजपाचे नेते धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, आंदोलनाचा आज 19 वा दिवस आहे. मात्र अद्याप शासनाने यासची दखल घेतलेली नाही. शासन जर निर्लज्जपणा करत असेल तर आम्हीही गप्प बसणार नाही . येत्या सोमवार 12 जुलै पासून आम्ही येथील शासकीय कार्यालयांच्या दारात बसून आंदोलन करणार असून अधिकार्यांना कार्यालयात जावू देणार नाही.
अकलूज, माळेवाडी नगरपरिषद व नातेपुते नगरपंचायत व्हावी यासाठी या गावचे नागरिक गत 19 दिवसांपासून साखळी उपोषणाला बसले आहेत. शासनाच्या एकाही प्रतिनिधीने येऊन साधी चौकशी केली नाही. हे सर्व अधिकारी कोणाच्या तरी दबावाखाली वावरत असल्याचे जाणवतेय. जर तुम्हाला तीन गावच्या नागरिकांची काळजी नसेल तर आम्हीही कोणाची काळजी करणार नाही. येत्या सोमवारपासून अकलूजमधील सर्व शासकीय कार्यालयांच्या दारात हे नागरिक जाऊन बसतील. येणार्या कोणत्याही अधिकार्यांला कार्यालयात जाऊ देणार नाही. त्यांना काम करु देणार नाही. नागरिकांच्या संयमाचा बांध आता फुटू लागला आहे. येथून पुढे आंदोलनाची तीव्रता आणखीनच वाढणार असून शासनाने या गोष्टीची दखल घ्यावी,असे मोहिते पाटील यांनी स्पष्ट केले.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा शुक्रवारी माळशिरस तालुक्यात दौरा होता. पण त्यांनी जाणीवपूर्वक अकलूजला येऊन उपोषणकर्त्यांना भेटण्याचे टाळले. यावरूनच पालकमंत्र्यांना नागरिकांची किती काळजी आहे हे दिसून येतेय. आम्ही तीनही गावचे नागरिक पालकमंत्र्यांच्या या बेजबाबदारपणाचा निषेध करीत असल्याचे धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले.