आवताडे शुगरकडून ऊसदराचा पहिला हप्ता २५५१ रु. जाहीर
कामगारांना ८.३३ % बोनस देण्याची घोषणा
पंढरपूर – मंगळवेढा तालुक्यातील नंदुरच्या आवताडे शुगर अॅन्ड डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याने उसाचा दर जाहीर केला असून पहिला हप्ता प्रतिटन २५५१ रुपये देणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे यांनी जाहीर केले आहे. तर कामगारांना ८.३३% बोनस देणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
शुक्रवारी सकाळी कारखान्यावर संजय आवताडे यांच्या उपस्थितीत व कारखान्याचे टेक्निकल विभागाचे व्यवस्थापक सुहास शिनगारे व त्यांच्या पत्नी गौरी शिनगारे यांचे हस्ते होमहवन व सत्यनारायण महापूजा करून डिस्टिलरी विभागाचा द्वितीय बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आला. तसेच पहिल्या ११ साखर पोत्या़चे पूजन करण्यात आले. याप्रसंगी मंगळवेढा मार्केट कमिटीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके, कार्यकारी संचालक मोहन पिसे, डिस्टिलरी मॅनेजर संभाजी फाळके, विजय माने , शाम पवार, चंदू गोडसे, गोपाळ पवार, श्रीकांत पवार, मोहन पवार उपस्थित होते
यावेळी बोलताना आवताडे म्हणाले की, आमदार समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली फॅबटेक समूहातून हा कारखाना खरेदी करून आवताडे शुगर मध्ये रूपांतरित केल्यानंतर पहिल्या गळीत हंगामामध्ये २३५० रुपये ऊस दर देत खासगी कारखानदारीमध्ये सर्वाधिक दर दिला होता. आम्ही हा कारखाना केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतला असून या कारखान्यामधून कोणताही स्वार्थ ठेवला नाही. गेल्या गळीत हंगामामध्ये कारखान्याचे सर्व कर्मचारी, ऊस पुरवठादार, ऊस वाहतूकदार, ऊसतोड मजूर व कारखाना प्रशासनाने मन लावून व प्रामाणिक काम केल्यामुळे गतवर्षीचा गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पाडला. यावेळीही असेच सहकार्य सर्वांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले.