राजकिय

मोहोळ विधानसभा|भीमाचे उपाध्यक्ष सतीश जगताप यांचा राजू खरे यांना पाठिंबा


पंढरपूर – मोहोळ विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राजू खरे यांना पाठिंबा देणार्‍यांची संख्या वाढत चालली असून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्यापाठोपाठ भीमा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष सतीश जगताप व त्यांच्या सहकार्‍यांनी सोमवारी आपला पाठिंबा खरे यांना जाहीर केला आहे.
सोमवारी सोहाळे येथे हा पाठिंबा जाहीर करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे, मोहोळ मतदारसंघ अध्यक्ष श्रीकांत गायकवाड, तालुकाध्यक्ष विनय पाटील, भीमाचे संचालक अनिल कदम, शेतकरी संघटनेचे छगन पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील पदाधिकारी व या भागातील सरपंच, सोसायटीचे चेअरमन व विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जगताप हे भाजप नेते खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली चालणार्‍या भीमा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत. लोकसभा निवडणुकीतही सतीश जगताप यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला होता व त्यांच्या प्रचारात सहभागी झाले होते. आता विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडी सोबत राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून त्यांच्या या पाठिंब्यामुळे या भागात महाविकास आघाडीचे उमेदवार राजू खरे यांची ताकद आणखीन वाढली आहे.
मागील दोन दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार उमेदवार राजू खरे यांना आपला पाठिंबा जाहीर केला होता. पेनूर येथे कार्यक्रम आयोजित करून त्यांनी खरे यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला होता.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी कॉंगे्रस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजू खरे म्हणाले की , सतीशअण्णा जगताप यांनी शेतकर्‍यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी खूप काम केले आहे. ते शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. ते भीमा कारखान्याचे उपाध्यक्ष आहे. त्यांनी आजवर पक्षीय राजकारण बाजूला कारखान्याचे हित जपले आहे. ही संस्था व भीमा परिवार एकसंघ राहावा यासाठी काम केले आहे. यामुळे सतीश जगताप यांच्यावर या भागातील तसेच पंढरपूर भागातील सतरा गावातील जनता प्रेम करते.
आण्णांनी निर्णय घेण्याअगोदर त्यांनी मागील पंधरा दिवसांपासून सर्वांशी चर्चा केली असून सर्व कार्यकर्त्यांनी येथे चांगले काम करणारे महाविकास आघाडीचे उमेदवार राजू खरे यांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती. शरद पवारसाहेबांनी अगोदर जाहीर झालेली उमेदवारी रद्द करू खरे यांना उमेदवारी दिली आहे. जर पवारसाहेब निर्णय बदलत असतील तर सतीशआण्णांनी ही निर्णय बदलून राजू खरे यांच्या पाठीशी उभे रहावे, असा आग्रह धरल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर त्यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांच्या उपस्थितीत आपल्याला पाठिंबा जाहीर केला असल्याचे राजू खरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close