आठवडाभरावर निकाल, माढ्याबाबत राज्यभर कमालीची उत्सुकता
पंढरपूर – लोकसभा निवडणुकीचा निकाल आता एक आठवड्यावर आला असून अत्यंत चुरशीने निवडणूक पार पडलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार ? याची उत्सुकता संपूर्ण राज्यात दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी सात मे रोजी मतदान पार पडले तर आता 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल अवघ्या एक आठवडा राहिला असताना मोहिते पाटील व खा.निंबाळकर या दोन्ही गटांकडून विजयाचा दावा केला जात आहे. माढा लोकसभा मतदारसंघ 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात हॉटस्पॉट बनला होता. येथील निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली असून राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस व खासदार शरद पवार यांनी या निवडणुकीमध्ये आपापल्या बाजूने मोठी व्यूहरचना आखून एकमेकांना शहर देण्याचा प्रयत्न केला आहे.
महाराष्ट्रामध्ये बारामती व माढा या दोन लोकसभा मतदारसंघांवर सर्वांचे लक्ष आहे भारतीय जनता पक्षामधून बाहेर पडत धैर्यशील मोहिते पाटील यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासमोर कडवे आव्हान या निवडणुकीत उभे केले होते.
सुरुवातीला भाजपसाठी एकतर्फी वाटणारी ही निवडणूक नंतर मात्र रंगतदार बनली. सात मे पासून आतापर्यंत रोज या निवडणुकीचे वेगवेगळ्या प्रकाराने विश्लेषण होत आहे. येथील चुरस पाहता निवडून येणारा उमेदवार हा काठावर मताधिक्य घेईल असे दिसत आहे.
या निवडणुकीत माळशिरस विधानसभा मतदारसंघ हा महत्त्वाचा असून येथील मताधिक्यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे. धैर्यशील मोहिते पाटील हे माळशिरस तालुक्यातील असल्याने त्यांना स्थानिक म्हणून येथील मतदार जास्त मतदान करतील , असा कयास असा आहे यातच त्यांचे जुने विरोधक उत्तमराव जानकर यांनीही मोहिते पाटील यांची साथ केल्याने या मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांना किती मताधिक्य मिळतं यावर निवडणुकीचे गणित अवलंबून आहे .
2019 च्या निवडणुकीत माळशिरस मतदारसंघाने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना एक लाख 16 हजार चे मताधिक्य दिले होते. यंदा मोहिते पाटील व जानकर हे निंबाळकर यांच्यासोबत नसल्याने माळशिरस मधून भाजप ला किती मते मिळतात ? हे पाहणे औत्सुक्याचे आहे. येथे भाजपने मोठी फिल्डिंग लावून मोहिते पाटील विरोधकांना एकत्र करून मत मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. यात त्यांना कितपत यश येणार हे आता चार जून नंतर लक्षात येईल.
माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात प्रचाराचा धुरळा उडवला. यामुळे निवडणूक रंगतदार स्थितीत आली होती . भाजपनेही कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ जिंकायचाच ,असा चंग बांधत येथे प्रचार केला आहे. महायुती मधील सर्वच घटकपक्ष या निवडणुकीत भाजपची साथ करताना दिसले. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी मोहिते पाटील यांनी निर्माण केलेला सस्पेन्स, याच काळात त्यांचे झालेले गाव भेट दौरे , अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर भाजप विरोधी पक्षाच्या नेत्यांची लागलेली हजेरी व यानंतर त्यांनी शरद पवार यांच्या पक्षाकडून घेतलेले तिकीट यामुळे राज्यभर ही निवडणूक गाजली व सर्वांचे लक्ष या मतदारसंघाकडे वेधले गेले. याचा फायदा मोहिते पाटील यांना निवडणुकीत झालेला पहावयास मिळाला. त्यांची क्रेझ मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती.