सोलापूर – काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांची मंगळवारी सोलापूर येथे शिंदे यांच्या निवासस्थानी भेट होवून विविध विषयांवर चर्चा झाली. काँग्रेसकडून सर्व विधानसभा मतदारसंघात उमेदवार चाचपणी सुरु असताना झालेल्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यामुळे काँग्रेस आणि जगताप कुटुंबाची नाळ पुन्हा जुळणार का? हा मुद्दा चर्चेत आला आहे.
सुशीलकुमार शिंदे आणि जगताप यांच्या भेटीवेळी खासदार प्रणिती शिंदे या उपस्थित होत्या. या भेटीमुळे जगताप हे आगामी निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार असतील का? अशी चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस आणि जगताप घराणे यांचे जुने संबंध असून ती जुनी नाळ पुन्हा जोडण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्याचे या भेटीमुळे समोर आले आहे.
भेटीबाबत जगताप यांना विचारले असता, त्यांनी ही सदिच्छा भेट होती. शिंदे साहेबांचे व माझे खूप जुने ऋणानुबंध असून स्थानिक राजकीय परिस्थितीमुळे जरी पक्षीय पातळीवर काहीवेळा वेगळे निर्णय घेतले असले तरी माझी त्यांच्यावरील श्रद्धा व त्यांचे माझ्यावरील प्रेम तसूभरही कमी झाले नाही. भावनिकदृष्ट्या व वैचारिकदृष्टया सुशीलकुमार शिंदे, शरद पवार व विजयसिंह मोहिते – पाटील यांच्याशीच आपली नाळ जुळलेली आहे. त्यामुळे अशा भेटी, संवाद, विचारपूस होत असते.
जगताप यांचे वडील माजी आमदार नामदेवराव जगताप हे तत्वनिष्ठ काँग्रेस नेते होते. पक्षात आणि जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा वेगळा प्रभाव होता. या पार्श्वभूमीवर काँग्रेसची विचारधारा जगताप कुटुंबात रुजलेली आहे. पुढील काळात तत्कालीन परिस्थितीला अनुसरून राजकीय निर्णय घेताना जयवंतराव जगताप यांचा इतरही काही पक्षात प्रवेश झाला. मात्र आता पुन्हा जगताप आणि काँग्रेस हे समीकरण जुळून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जगताप काँग्रेसमध्ये सक्रिय होणार का? हा मुद्दा आता चर्चेत आला असून शिंदे – जगताप भेट विधानसभेच्या राजकीय आखाड्यात नेमका कोणता भविष्यकाळ घेवून येणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
Back to top button