राज्य

उन्हाळी सुट्टीत शिक्षकांना जनगणनेचे काम


पंढरपूर –  आगामी जनगणना 2027 च्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना उन्हाळी सुट्टीच्या काळातही कामावर उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले असून, यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत जनगणनेचे काम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत शाळांना उन्हाळी सुट्टी असली तरी प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी आपल्या कार्यक्षेत्रात उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पत्रात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, या काळात कोणत्याही शिक्षकाने मुख्यालय सोडू नये तसेच रजेची सवलत दिली जाणार नाही. त्यामुळे शिक्षकांना सुट्टीतही जनगणनेच्या कामात सक्रिय सहभाग घ्यावा लागणार आहे. दरम्यान, शिक्षक संघटनांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. दरवर्षी निवडणुका, सर्वेक्षण आणि इतर शासकीय कामांमध्ये शिक्षकांची नियुक्ती केली जात असल्याने त्यांच्या शैक्षणिक व वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होत असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः उन्हाळी सुट्टीत कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा हक्क हिरावला जात असल्याची टीका संघटनांकडून करण्यात आली आहे.
दुसरीकडे, प्रशासनाने जनगणना हे अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय कार्य असल्याचे सांगत शिक्षकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close