पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाचा सुधारित आराखडा करण्यासाठी मंदिर परिसरात ड्रोन कॅमेराव्दारे चित्रीकरण
पंढरपूर – श्री क्षेत्र देहू, आळंदी, भंडारा डोंगर, पंढरपूर पालखी तळ व मार्ग विकास आराखड्यांतर्गत पंढरपूर व पालखी मार्गावर भाविकांना पायाभूत सुविधा देण्यासाठी नव्याने समाविष्ट करावयाच्या कामांचा सुधारित सर्वकंष आराखडा तयार करण्यात येत आहे. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याबाबत मोठ्या प्रमाणात हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यामध्ये कोणत्या सूचनांचा समावेश करता येईल या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार मंदिर व मंदीर परिसरात ड्रोन व्हिडीओ कॅमेराव्दारे चित्रीकरण करण्यात येत आहे.
पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात नव्याने समाविष्ठ करावयाच्या कामांबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी, वारकरी संघटना, विश्वस्त, महाराज मंडळी, व्यापारी, नागरिक, पत्रकार यांच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. याबाबत प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करुन वारकरी भाविकांसह स्थानिक नागरिकांना तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातंर्गत आवश्यक सुविधा देण्यासाठी सर्वसमावेशक असा आराखडा तयार करण्यात येत आहे. यासाठी मंदीर , मंदिर परिसर, दर्शन रांग, चंद्रभागा वाळवंट, नदीवरील घाट, बंधारे आदी ठिकाणचे ड्रोन व्हिडीओ कॅमेराव्दारे चित्रीकरण करण्यात येत आहे. चित्रिकरणास कोणताही अडथळा येऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन, नगरपालिका, पोलीस प्रशासन, मंदीर समिती येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समवेत चित्रीकरण करण्यात येत आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आवश्यक सुविधा मिळाव्यात यादृष्टीनेही आराखडा तयार करण्यात येणार आहे. यामध्ये मंदिरातील मूळ वास्तूचे जतन करून मंदिर व मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे. यासाठी मंदीर समिती व वास्तूविशारद यांच्यामार्फत कामकाज करण्यात येणार आहे. मंदिर परिसरात ड्रोन व्हिडीओ कॅमेराव्दारे चित्रिकरण करतेवेळी प्रांताधिकारी गजानन गुरव, मुख्याधिकारी अरविंद माळी, सहा.पोलीस निरिक्षक चिमणाजी केंद्रे, मंदीर समितीचे अभियंता केतन भोंगे तसेच चितानंद सर्वगोड, महेश कांबळे उपस्थित होते.