गणपतआबांनी आयुष्यभर वंचित, शोषितांची सेवा केली, ही पुण्याई त्यांना आणखी आयुष्य देईल.. भाई जयंत पाटील यांचे भावोद्गार
पंढरपूर- शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांची तब्बेत सुधारावी अशी प्रार्थना राज्यभरातून होत असून विविध पक्षांचे व व संघटनांचे प्रमुख व पदाधिकारी सतत आपल्या संपर्कात आहेत. आबांनी आयुष्यभर वंचित ,शोषितांची सेवा केली असून या पुण्याईच्या जोरावर त्यांना आणि दीर्घायुष्य लाभेल, अशी आशा शेकापचे नेते भाई जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
भाई गणपतराव देशमुख यांची तब्बेत चिंताजनक असली तरी ती आता स्थिर असून त्यांच्यावर सोलापूरच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. एक महिन्यापासून ते आजारी आहेत. मागील आठवड्यातही आपण आबांची तब्बेत बिघडल्याचे समजल्यावर सांगोल्यात आलो होतो. ते कोणाशी बोलत नव्हते. त्यांना सोलापूरला उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या घरात तीन डॉक्टर आहेत. दोन नातू व सून हे स्वतःच या क्षेत्रातील आहेत. त्यांचे नातू डॉ.बाबासाहेब हे कोलकता येथे होते व त्यांची परीक्षा असताना त्यांनी आजोबांसाठी ते तातडीने येथे आल्याचे जयंत पाटील म्हणाले.
काल दुपारी भाई गणपतराव देशमुख यांची तब्बेत जास्तच बिघडल्याने काही अफवा पसरल्या व यानंतर राज्यभरातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. अनेकजण सांगोल्याला निघाले होते. आम्ही काही प्रमुख पदाधिकारी पंढरपूरला काल आलो असून आता सोलापूरला निघालो असल्याचे सांगत पाटील म्हणाले, आबांची पुण्याई फार मोठी आहे. त्यांनी आयुष्यभर वंचित, शोषित यांच्यासाठीच काम केले आहे. ही पुण्याई त्यांना आणखी आयुष्य देईल. त्यांची तब्बेत चिंताजनक असल्याने डाव्या पक्षातील नेते तर सतत संपर्कात आहेतच पण अन्य पक्षातील लोक ही सतत माझ्याकडे विचारणा करत आहेत. मी आता येथून सोलापूरला जात असून त्यांची आबांची तब्बेत ठिक होवो अशी आमची इच्छा आहे. असे ही शेकाप नेते भाई जयंत पाटील म्हणाले.
दरम्यान गणपतराव देशमुख यांच्या तब्बेत ठिक नसल्याने व ती चिंताजनक असल्याच्या बातमीने राज्यभरात राजकीय, सामाजिक तसेच विविध संघटनाचे पदाधिकारी सतत त्यांच्या तब्बेची चौकशी करत आहेत. राज्याच्या राजकारणातील ते महत्वाचे ज्येष्ठ नेते असून त्यांचे सर्वच राजकीय पक्षांशी नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत. दरम्यान पक्षातील प्रमुख सत्ताधारी नेते तसेच विरोधी पक्षातील पदाधिकारी सतत ही सोलापूरच्या संपर्कात असून ते भाई देशमुख यांच्या तब्बेची चौकशी करत आहेत.