भीमाकाठासाठी महत्वपूर्ण : मोठे बंधारे बांधण्याचा प्रस्ताव शासनाने मागवून घेतला, आ. आवताडे यांची होती मागणी
पंढरपूर – पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांनी भीमा नदीतून वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी नव्याने काही बंधारे बांधण्याची मागणी केली होती. यास शिंदे- फडणवीस सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला होता. आता पाटबंधारे विभागानेही याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला असून नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या प्रत्येक तीन बंधार्यानंतर एक नवा जास्त पाणी साठवण क्षमतेचा बंधारा बांधला जाणार आहे. त्याची उंची साडेसात ते नऊ मीटरपर्यंत असणार आहे. यात दोन टीएमसी पाणीसाठा राहील, याचे नियोजन केले जाणार आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या उशाशी जरी उजनी धरण असले तरी अद्याप अनेक भागात पाणी टंचाई जाणवेत. अनेक उपसा सिंचन योजना अर्धवट आहेत. वर्षानूवर्षे याचे काम सुरूच आहे. अलिकडच्या काही वर्षात चांगले पर्जन्यमान होत असल्याने उजनी व वीर मधून मोठ्या प्रमाणात सोडले जाते व ते भीमा नदीतून वाहून जाते. हे पाहता नदीवर मोठे बंधारे (बॅरेज) बांधावेत अशी मागणी होत होती. आमदार समाधान आवताडे यांनी काही दिवसांपासून राज्य सरकारला याबाबत विनंती केली होती. आदेशानंतर पाटबंधारे विभागाने नऊ बंधार्यांचा प्रस्ताव सादर केला आहे.
पावसाळ्यात कर्नाटकला वाहून जाणारे अतिरिक्त पाणी अडविण्यासाठी भीमा नदीवर जिल्ह्यात नऊ ठिकाणी साडेसात ते नऊ मीटर उंचीचे बंधारे बांधण्यात येणार असून त्याबाबतचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाने शासनाला सादर केला आहे. सध्या भीमा नदीवर कोल्हापूर पध्दतीचे सुमारे 22 बंधारे असून या बंधार्यांची उंची साडेचार मीटर आहे. पावसाळ्यात या बंधार्यांचे दरवाजे उघडले जातात. पावसाळा संपताना दरवाजे बंद करून पाणी अडविले जाते. नदी मार्गात बंधारे असल्यामुळे परिसरात सुमारे सात ते आठ किमी अंतरातील शेती समृध्द झाली आहे. भीमा व सीना नद्यांवर बॅरेज बांधून पाणी अडविण्याची अनेक दिवसांपासून मागणी आहे. कर्नाटक सरकारने सादेपूर आणि उमराणी दरम्यानच्या भीमा नदीवर सध्या सहा ते सात मीटर उंचीच्या बंधार्याचे बांधकाम युध्दपातळीवर सुरू केले आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने बंधारे बांधून शेतकर्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या प्रस्तावाचा पाठपुरावा करून निधी मिळविल्यास आगामी वर्षभरात भीमा नदीवर बंधारे बांधून पाणी अडविता येईल. जिल्ह्यातील पहिला बॅरेज दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूरजवळच्या भीमा नदीवर बांधला जाणार आहे. या बॅरेजचा खर्च आता 22 कोटी रुपयांवरून 92 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूरनजीकचे भीमा नदीचे पाणी कालव्याद्वारे सीना नदीत आणण्याचा प्रस्तावही शासनदरबारी असून नदीत पाण्याची उपलब्धता आहे का याचा अहवाल शासनाने पाटबंधारे विभागाकडून मागविला आहे. 18 किलोमीटर लांबीच्या या कालव्यापैकी साडेअकरा किमीचा कालवा हा बोगद्याचा असणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे दोनशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले. हा कालवा पूर्ण झाला तर सीना नदीत शाश्वत पाणी राहून उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकर्यांना उन्हाळ्यात भेडसावणार्या सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी दूर होणार आहे.
*अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. डॉ.प्रशांत पवार सर यांची मुलाखत*