विशेष

आमदार प्रशांत परिचारक यांनी दाखविली परिपक्व नेतृत्वाची झलक

पंढरपूर- चाळीस लाख टन उसाचे उत्पादन करणार्‍या पंढरपूर तालुक्याला सध्या बंद साखर कारखान्यांची समस्या भेडसावत असून आर्थिक अडचणीमुळे काही कारखाने सुरू होणार की नाही..याबाबत शंका असताना राजकारणाच्या पलिकडे जात आमदार प्रशांत परिचारक यांनी आपल्या ताब्यातील पांडुरंग व युटोपियन कारखान्यात जास्तीत ऊस गाळून शक्य तेवढ्यांना अन्य कारखान्यांना ऊस पुरवठा करणार्‍या शेतकर्‍यांना न्याय देण्याची भूमिका घेतल्याने याचे सर्वत्र स्वागत होत आहे. स्व. सुधाकरपंतांप्रमाणे आमदार परिचारक यांनी आपल्या परिपक्व नेतृत्वाची झलक दाखविली आहे.
तालुक्यातील इतर कारखाने अडचणीत आले असून यामुळे शेतकरी संकटामध्ये आला आहे. परंतु मी आवाहन करतो की, तुम्ही घाबरून जायचे कारण नाही. तुमचे आमचे राजकीय शत्रुत्व नाही, तुम्ही तालुक्यातील शेतकरी आहात. तुम्हाला न्याय देणे आमची जबाबदारी आहे. गरज पडल्यास पांडुरंग कारखाना तसेच युटोपियन कारखाना इतर कारखान्यांच्या सभासदांचा ऊस गाळप करण्यास कमी पडणार नाहीत असे आश्‍वासन आमदार प्रशांत परिचारक यांनी दिले आहे. श्रीपूर (ता.माळशिरस) येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत ते बोलत होते. तालुक्यातील काही साखर कारखाने सुरू होणार की नाही असा संभ्रम असून यामुळे हजारो शेतकर्‍यांना आपल्या उसाचे करायचे काय? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. परंतु परिचारक यांनी राजकीय गट तट बाजूला ठेवून शेतकरी वाचला पाहिजे, त्याच्या मालाला योग्य मोबदला मिळाला पाहिजे, ही दूरदृष्टी ठेवून शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे. शेतकरी म्हणून आम्ही इतर कारखान्याच्या सभासदांचा देखील ऊस गाळपासाठी आणण्यास तयार आहोत असे परिचारक यांनी जाहीर केले.
दरम्यान पंढरपूर तालुक्याच्या उसावर चालणारे विठ्ठल व भीमा या दोन कारखान्यांना शासनाची थकहमी कधी मिळणार यावर बरेच काही अवलंबून आहे. कल्याणराव काळे यांचा सहकार शिरोमणी कारखाना सुरू होत असून यास शासनाने मदत केली आहे. विठ्ठल कारखान्यासाठी शुक्रवारी पुण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठक बोलाविली असून यावर तोडगा निघू शकेल असा विश्‍वास शेतकर्‍यांना आहे. दरम्यान सांगोला सहकारी, सिताराम शुगर, आष्टीचा कर्मयोगी औंदुबररावजी पाटील साखर कारखाना तसेच करकंबचा विठ्ठलराव शिंदे युनिट दोन यासह मोहोळ तालुक्यातील जकराया व आटपाडी भागातील श्री श्री सद्गुरू यासारख्या कारखान्यांचे पर्याय शेतकर्‍यांना ऊस देण्यासाठी खुले आहेत.
परिचारक यांचे दोन कारखाने असून श्रीपूरचा पांडुरंग व मंगळवेढा तालुक्यातील युटोपियन शुगर्स मध्ये किमान 18 ते 20 लाख टन ऊस गाळपाची क्षमता आहे. पांडुरंग कारखाना हा राज्यातील अग्रेसर साखर कारखाना आहे. सलग तीन वर्षे चांगला पाऊस, मुलबल पाणीसाठे यामुळे यंदा उसाचे पीक राज्यातच जास्त असल्याने साखर कारखाने चालणे ही काळाची गरज आहे. उशिरा ऊसतोडणी झाल्यास शेतकर्‍यांचे नुकसान होते हे लक्षात शासनानेही अडचणीतील कारखान्यांबाबत लवकर निर्णय घेणे अपेक्षित आहे. यातच आता कारखान्यांची वर्गवारी जाहीर करून ऊसबिल लवकर न देणार्‍या कारखान्यांची यादी जाहीर करण्यात आल्याने सर्वच शेतकरी आता चांगल्या कारखान्यांकडे वळू लागले आहेत मात्र हे कारखाने सर्वांचा ऊस गाळू शकत नाहीत.
आमदार प्रशांत परिचारक यांनी तालुक्यातील अन्य कारखान्यांच्या सभासदांना दिलासा देत शक्य तेवढा जादा ऊस गाळप करू असे आश्‍वासन दिले आहे. आमदार बबनराव शिंदे यांचे दोन कारखाने पंचवीस लाख टन ऊस गाळप करणार आहेत. तो ही शेतकर्‍यांना चांगला पर्याय आहे. 

Header

Related Articles

Back to top button
Close
Close