राज्य

मूळचे पंढरपूरचे प्रख्यात साहित्यिक द. मा. मिरासदार यांचे निधन


पंढरपूर –  मूळचे पंढरपूरचे असणारे साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक दत्ताराम मारुती तथा द. मा. मिरासदार ह यांच पुण्यात राहत्या घरी वार्ध्यक्याने निधन झाले ते 94 वर्षाचे होते.
द.मा. या नावाने महाराष्ट्राला परिचित असणारे  द.मा. मिरासदार यांचा जन्म अकलूजला 14 एप्रिल 1927 रोजी झाला व त्यांचे शिक्षण पंढरपूरला झाले. एम.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पत्रकारितेत पदापर्ण केले व नंतर 1952 ला त्यांनी अध्यापनक्षेत्रात पाऊल ठेवले. मराठी  विनोदी लेखक व कथाकथनकार म्हणून ते प्रसिध्द झाले. पुण्याच्या कॅम्प एज्युकेशनच्या शाळेत ते शिक्षक म्हणून काम पाहत होते. प्रा.द.मा. मिरासदार यांचे शिक्षण पंढरपूरच्या नगरपरिषद व लोकमान्य शाळेत झाले. येथील सर्वात जुन्या नगरवाचन मंदिरातील पुस्तकात ते रमत व यातूनच त्यांना साहित्यक्षेत्राने खुणावले.
अत्यंत विनोदी असणार्‍या द.मा. मिरासदार यांनी पंंंढरपूरमध्ये त्यांनी पाहिलेल्या गोष्टींचा आपल्या कथाकथनात व विनोदी लेखनात वापर केला. पंढरपूरमधील निवांतपणा, फळीवरच्या गप्पा तसेच येथील लोकांचे चिरमुरे चिवड्यावरील प्रेम यावर त्यांनी भरभरून लिहिले आणि विनोद ही केले जे आजही महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांनी लोकमान्य शाळेशी आपली नाळ तुटू दिली नाही. जेंव्हा जेेंव्हा ते पंढरपूरला येत ते शाळेला भेट देत तसेच कार्यक्रमांना आवर्जुन हजेरी लावत. पंढरपूरकरांनी ही त्यांचा नेहमीच गौरव केला.


नाटक, चित्रपट कथा लेखव व साहित्यक्षेत्रात त्यांचे भरीव योगदान असून जवळपास 24 कथासंग्रह, अनेक विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या. ’एक डाव भुताचा’ या चित्रपटात कथा-पटकथा लेखनासह हेडमास्तरची भूमिकाही त्यांनी केली होती. द.मा. मिरासदार यांनी आपल्या कथांमध्ये अनेक पात्र उभी केली जी महाराष्ट्रात खूप गाजली यात  नाना चेंगट, गणा मास्तर, रामा खरात, बाबू पैलवान यांच्यासह पात्रांनी रसिकांना अक्षरशः पोट धरून हासायला लावले.साहित्य अकादमी, महाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्कार त्यांना मिळाला. याचबरोबर त्यांनी पुण्यात भरलेल्या 83 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविले.
द.मा. मिरासदार यांनी  कथाकथनाचे राज्यात ,परराज्यात व परदेशात तीन हजारांहून अधिक कार्यक्रम केले आहेत गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा असे  अनेक कथासंग्रह त्यांनी लिहिले. त्यांच्या बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर आहेत. त्यांनी आपल्या लेखनात ‘स्पर्श’, ‘विरंगुळा’, ‘कोणे एके काळी’ सारख्या काही गंभीर कथाही लिहिल्या.
द.मा. मिरासदार यांचे प्रकाशित साहित्यः अंगतपंगत , खडे आणि ओरखडे , गप्पांगण, गप्पा गोष्टी, गंमतगोष्टी, गाणारा मुलुख, गुदगुल्या, गोष्टीच गोष्टी, चकाट्या,चुटक्यांच्या गोष्टी , जावईबापूंच्या गोष्टी, ताजवा, नावेतील तीन प्रवासी, फुकट , बेंडबाजा, भुताचा जन्म, भोकरवाडीच्या गोष्टी, भोकरवाडीतील रसवंतीगृह, माकडमेवा,माझ्या बापाची पेंड, मिरासदारी, मी लाडाची मैना, विरंगुळा, सरमिसळ, सुट्टी आणि इतर पाच एकांकिका, स्पर्श, हसणावळ हुबेहूब. याचा समावेश आहे.
द.मा. मिरासदार हे 1998 च्या  परळी वैजनाथच्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांना पुणे महानगरपालिकेचा महर्षी वाल्मीकी पुरस्कार (2013), महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचा विंदा जीवनगौरव पुरस्कार ,एक डाव भुताचा आणि ठकास महाठक ह्या दोन चित्रपटांच्या संवादलेखनाबद्दल बक्षीस, प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (2014)
पुलोत्सवातील कार्यक्रमात त्यांना पु.ल.जीवनगौरवाने सन्मानित करण्यात आले आहे.
द.मा. मिरासदार हे मूळचे पंढरपूरचे असल्याने त्यांचे सत पंढरीत येणे जाणे होते. अलिकडे वय झाल्याने ते फारसे पंढरपूरला येत नसत. मात्र यापूर्वी पंढरपूरच्या अनेक कार्यक्रमांनी त्यांनी हजेरी लावली. त्यांचे बंधू व नातेवाईक आजही पंढरपूरलाच राहतात. द.मा.च्या लेखनात पंढरपूरचे अनेक विनोदी किस्से आहेत.

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close