कारखान्याच्या उन्नतीसाठी श्री शंभू महादेवाची पायी वारी करणारे आमदार
पंढरपूर – माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथील श्री शंकर सहकारी साखर कारखान्याला पुन्हा गैतवैभव प्राप्त करून देण्यासाठी अध्यक्ष आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे कारखाना ताब्यात आल्यापासून सतत प्रयत्न करत आहेत. यंदा तर त्यांनी जवळपास 32 कोटी रूपयांची वैयक्तिक थकहमी देवू केल्याने हा कारखाना 2022-23 च्या गळीत हंगामात उतरू शकणार आहे. हा हंगाम यशस्वी व्हावा, यासाठी मोहिते पाटील यांनी शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाला साकडे घालण्यासाठी पायी वारी केली.
शिखर शिंगणापूरचे शंभू महादेव हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिध्द असून ते सोलापूर व सातारा जिल्ह्याच्या सीमेवर आहे. मोहिते पाटील यांची या देवस्थानावर श्रध्दा असून त्यांनी यापूर्वीही पायी वार्या केल्या आहेत. श्री शंकर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत जिंकल्यानंतर आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी या कारखान्याला सुुस्थितीत आणण्याचा चंग बांधला आहे. शेतकर्यांची थकीत देणी , कामगारांचे थकलेले वेतन ते ठराविक कालावधीत देत आहेत. मागील हंगामात कारखान्याने साडेतीन लाख टन ऊस गाळला होता तर यंदा सहा लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यांनी हा कारखाना सुरू व्हावा यासाठी 32 कोटी रूपये स्वहमीवर उभा केले आहेत. आता येणार्या हंगामात किमान अडीचशे कोटी रूपयांची उलाढाल उपेक्षित आहे. आता कारखाना सुरू होत असताना मोहिते पाटील यांनी श्री शंभू महादेवाची पायी वारी केली आहे. यापूर्वी ही त्यांनी कारखान्यात उत्पादित साखर पोते पायी वारीने श्री चरणी अर्पण केले होते.
एका बाजूला कारखान्याला सुस्थितीत आणण्यासाठी अर्थकारण, तंत्रज्ञानाचा वापर होत असताना दुसरीकडे श्री शंभू महादेवाचा आशीर्वाद घेतला जात आहे. श्री शंकर सहकारी साखर कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांचे सतत प्रयत्न सुरू आहेत. या कारखान्याच्या सभासदांनी मागील निवडणुकीत त्यांच्यावर विश्वास दाखवून कारखाना ताब्यात दिला आहे.