विशेष

थकीत “एफआरपी” साठी सहकार शिरोमणी कारखान्यावर “आरआरसी” नुसार कारवाईचे आदेश


पंढरपूर – तालुक्यातील भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याकडे गळीत हंगाम 2020-21 मध्ये गाळप केलेल्या शेतकर्‍यांच्या उसाची 19 कोटी 69 लाख रूपये एफआरपी थकीत असून ही रक्कम कारखान्याकडे जमीन महसुलाची थकबाकी समजून वसूल करण्याचे म्हणजे आरआरसी कारवाईचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत.
यासाठी कारखान्याने उत्पादित केलेली साखर, मळी, बगॅस याची विक्री करण्यात यावी तसेच आवश्यकता भासल्यास कारखान्याच्या स्वतःच्या जंगम व स्थावर मालमत्तेच्या दस्ताऐवजावर शासनाच्या नावाची नोंद करावी व याची जप्ती करून विहित पध्दतीने विक्री करून या रकमेतून ऊस नियंत्रण 1966 मधील तरतुदीनुसार संबंधित ऊस उत्पादक शेतकर्‍यांना 15 टक्के व्याजासह अदा करावी. याबाबत जिल्हाधिकारी सोलापूर यांना कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत.
साखर आयुक्तांनी पाठविलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, 22 सप्टेंबर 2020 रोजी आयुक्तालयाने कारखान्याला पत्र पाठवून शेतकर्‍यांना एफआरपीची रक्कम विहित मुदतीत अदा करण्याची सूचना केली होती. याचे पालन न करता कारखान्याने ऊस नियंत्रण 1966 च्या तरतुदीचे उल्लंघन केले आहे. दरम्यान कारखान्याने शेतकर्‍यांची एफआरपी थकवली असल्याची तक्रार कारखान्याचे माजी संचालक अ‍ॅड. दीपक पवार यांनीही नुकतीच साखर आयुक्तांकडे केली होती. तसेच याबाबत त्यांनी यापूर्वी सोलापूरच्या सह संचालकांनाही कळविले होते.
साखर कारखान्याने 2020- 21 च्या हंगामात 2 लाख 26 हजार 601 मे. टन उसाचे गाळप केले आहे. या कारखान्याची एफआरपी प्रतिटन 2152 रूपये 40 पैसे इतकी आहे. 

Header

Related Articles

Back to top button
Close
Close