म्हणे.. राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या विचारांची राहिली नसून यात दुसर्यांचेच हुकूम चालतात..
अकलूज – नागरिकांचे हित कधीही खासदार शरद पवार यांनी डावलले नाही किंवा जनतेच्या हिताच्या कामात त्यांनी कधी राजकारण आणले नाही. आजच्या राष्ट्रवादीत नीतीमूल्यांचा र्हास झाला असून ही राष्ट्रवादी साहेबांच राहिली नसून आता इथे दुसर्यांचेच हुकूम चालतात, अशी घणाघाती टीका भाजप महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी अकलूज येथे केली.
अकलूज नगरपरिषद व नातेपुते नगरपंचायत व्हावी यासाठी गत सहा दिवसांपासून प्रांत कार्यालयागाहेर तीन गावच्या नागरिकांचे साखळी उपोषण सुरु आहे. यास भेट देण्यासाठी चित्रा वाघ अकलूज येथे आल्या होत्या. यावेळी त्या बोलत होत्या. अकलूज व नातेपुते येथील ग्रामस्थ आपल्या मागण्यांसाठी आक्रमक झाले असून अगोदर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण माळशिरसला केले व नंतर आता अकलूजच्या प्रांत कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू आहे. यात आता भाजपाचे वरिष्ठ नेते येवू लागल्याचे दिसत आहे. रविवारी चित्राताई वाघ यांनी या आंदोलनास भेट देवून राष्ट्रवादी काँगे्रस पक्षावर जोरदार टीका केली.
त्या म्हणाल्या, प्रशासकीय प्राथमिक टप्प्यात असणार्या गावांना नगरपरिषदेची मंजुरी दिली जाते. बारामती तालुक्यातील गावाला नगरपरिषदेची मंजुरी मिळते. मात्र माळशिरस तालुका मोहिते पाटील यांचा असल्याने भाजपाचा म्हणून इथल्या गावांची मंजुरी अडविली जातेय. राष्ट्रवादीचे हे राजकारण नागरिकांच्या विकासाला मारक आहे. तुम्ही कितीही राजकीय खेळ खेळा पण सोलापूर जिल्ह्यात तुमची डाळ शिजणार नाही. अधिवेशनाचा कालावधी वाढवला तर विरोधी पक्ष फाडून खातील म्हणून त्यांनी याचा कालावधी दोन दिवसांचा ठेवलाय. कोरोनाच्या नावाखाली बर्याच गोष्टी पुढे ढकलल्या आहेत, असा घणाणाती टीका त्यांनी यावेळी केली.
जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अद्याप उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांची अडचण विचारली नाही. तुम्हाला आमच्यापर्यंत यायला जमत नसेल तर आम्ही आंदोलनाच्या मार्गाने तुमच्या दारापर्यंत येऊ असा इशारा चित्रा वाघ यांनी यावेळी दिला.
राजकारणाच्या खेळात जनतेला भरडू नका असे आवाहन करत जि.प.सदस्या शीतलदेवी मोहिते पाटील यांनी शासनावर कडाडून टीका केली. तर विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव होईल म्हणून त्यांनी अकलूज व नातेपुते नगरपरिषदेची मंजुरी अडवून ठेवल्याचा आरोप आमदार राम सातपुते यांनी केला.
यावेळी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, भाजपाचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहीते पाटील, वैष्णवीदेवी मोहिते पाटील, फातिमा पाटावाला, सुनंदा फुले, पायल मोरे, जि.प.सदस्य, ग्रा.पं.सदस्य व महिला व पुरुष उपस्थित होते.