महाड जवळच्या तळीये गावात दरड कोसळून 32 जणांचा दुर्दैवी मृत्यू
मुंबई- कोकणातील महाडजवळ तळीये येथे एका वाडीवर दरड कोसळून जवळपास 32 गावकरी मृत्यूमुखी पडले आहेत. यासह राज्यात आतापर्यंत पाऊस व महापुरामुळेच्या दुर्घटनेत 44 जणांना आपले प्राण गमवावे लागले असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. दरम्यान राज्यातील परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंत्रालयात जावून घेतला व यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मदत कार्यात सर्व यंत्रणा सहभागी असल्याचे सांगितले.
अतिवृष्टीमुळे डोंगरी भागात दरडी कोसळण्याचे प्रकार वाढले असून महाडजवळील तळीये या काही कुटुंबांच्या वाडीवर दरड कोसळून 32 जण मृत्यूमुखी पडले आहेत. अद्याप बचाव कार्य सुरू असून या ठिकाणी एनडीआरएफ ची पथक पोहोचली आहेत. तसेच स्थानिक प्रशासनाचे अधिकारी तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. खासदार सुनील तटेकर हे तळीये गावात जाण्यास निघाले आहेत. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तळीये गावात जावून घटनास्थळाची पाहणी केली आहे. तसेच प्रशासनास तातडीने पंचनामे करण्यास सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान मंत्रालयात आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेवून राज्यातील पूरस्थिती तसेच पाऊस व दुर्घटना याची माहिती घेतली. ते म्हणाले, गेले चार दिवस माझे या परिस्थितीवर लक्ष आहे. सतत आम्ही आढावा घेत आहोत तसेच सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. मदत कार्यालत एनडीआरएफ, एअरफोर्सही सहभागी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दूरध्वनी करून येथील परिस्थितीची माहिती घेतली असून मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान तळीये गावातील दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांचा सध्याचा आकडा हा 32 असला तरी निश्चित संख्या ही येथील संपूर्ण परिसरातील रेस्न्यू ऑपरेशन संपल्यानंतरच समजून येणार आहे.