भीमा व नीरा खोर्यात तुफान पर्जन्यवृष्टी, धरणं झपाट्याने भरू लागली, उजनीला ही मोठा फायदा होणार
पंढरपूर – भीमा व नीरा खोर्यात अक्षरशः पावसाने थैमान घातले असून धरणांवर तसेच परिसरात रेकॉर्डब्रेक पावसाने हजेरी लावली आहे. खडकवासला साखळी धरणं व मुळशी, पवना परिसरात होत असलेल्या मुसळधार पर्जन्यमानामुळे तेथील प्रकल्प झपाट्याने भरू लागले आहेत. खडकवासला प्रकल्पातून सतत पाणी सोडले जात असून यामुळे उजनीला फायदा होत आहे. शुक्रवारी भरलेल्या कासारसाई व वडिवळे धरणातूनही पाणी सोडण्यात आले. यासह लोणावळा व खंडाळा भागातून थेट इंद्रायणीतून उजनीत येणार्या पाण्यातही वाढ होत असून त्या भागात तुफान पर्जन्यवृष्टी झाली आहे.
मागील चोवीस तासात मुळशीवर 332 मि.मी पवना प्रकल्पावर 227 ,टेमघर 270, वडीवळे 214, पानशेत 170, वरसगाव 170 मि.मी. यासह मुळशी परिसरातील विविध भागात मुसळधार पर्जन्यमान नोंदले गेले आहे. यात दावडी कॅम्पस भागात 438 मि.मी., दसावे 402 मि.मी. ची नोंद आहे. इंद्रायणी नदीत पाणी आणणार्या खंडाळा भागात 206 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. काल लोणावळ्यात 390 मि.मी. असा रेकॉर्डब्रेक पाऊस झाला होता. डोंंगर भागात पावसाचे प्रमाण जास्त हे पाणी वाहून भीमा खोर्यातील धरणात तसेच भीमेच्या उपनद्यांमध्ये येत आहे. याचा फायदा आगामी काळात उजनीला होणार आहे.
नीरा खोर्यात ही पावसाने थैमान घातले असून गुंजवणीवर 171 तर नीरा देवघर धरणावर 142 मि.मी. पाऊस झाला आहे तर या परिसरातील शिरावली 326 तर शिरगाव भागात सर्वाधिक 482 मि.मी. पर्जन्याची नोंद आहे. भाटघर, गुंजवणी धरण परिसरातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहे. भाटघर भागातील भुतोंडेत 227 मि.मी. तर वीर परिसरातील वाल्हेमध्ये 167 तर गुंजवणीच्या भागातील घिसारमध्ये 293 मि.मी. पर्जन्याची नोंद आहे. यासह भीमा नीरा खोर्यातील धरणांच्या जलाशयात पाणी वाढविणार्या अनेक भागात जोरदार पाऊस अद्याप सुरू आहे.
दरम्यान खडकवासला प्रकल्पातून 4 हजार 260 तर वडिवळेमधून 6259, कासारसाईतन 2819 क्युसेकने पाणी सोडले गेले आहे. या पावसाने धरणं झपाट्याने भरू लागली आहेत. (याचा आजचा तक्ता खाली दिला आहे. )