राजकिय

भाग्यवान आमदार !..समाधान आवताडे, मुख्यमंत्री ठाकरे यांची मिळाली पंढरीत भेट..उध्दवजींनी दिल्या जुन्या सहकार्‍याला शुभेच्छा


पंढरपूरः मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट मिळणे हे अगोदरच अवघड आणि यात पंढरपूरमध्ये तर अतिशय कठीण..मात्र येथून नुकतेच पोटनिवडणुकीत विजयी झालेले भारतीय जनता पक्षाचे आमदार समाधान आवताडे यांना आषाढी एकादशी दिवशी उध्दवजींच्या दर्शनाचा लाभ मिळाला आणि ठाकरे यांनी त्यांचे जुने सहकारी असणार्‍या आमदार आवताडे यांना शुभेच्छा तर दिल्या सोबत चांगले काम करण्यास  सांगितले.
उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यापासून दोनवेळा पंढरपूरला आले आणि दोन्हीवेळी कोरोनाचे संकट आहे. यामुळे त्यांचा दौरा आखताना अत्यंत काळजी घेते. मुळात ठाकरे हे स्वतःच या कोरोनाकाळात राज्याबरोबर आपलीही काळजी घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावरून अनेकदा विरोधकांनी टीका देखील केली मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत आपले काम सुरू ठेवले आहे. मागील वर्षी ते आषाढीच्या महापूजेला आले होते तेंव्हा महाविकास आघाडीमधील एका सहयोगी पक्षातील आमदाराला त्यांची भेट घेवून निवेदन देण्यासाठी खूप खटाटोप करावा लागल्याच्या चर्चा आहेत. यंदाच्या आषाढीतही त्यांच्या दौर्‍यावरील विश्रामगृहात अथवा मंदिरात अगदी मोजक्याच लोकांना प्रवेश होता. मुख्य पूजेच्या ठिकाणी तर ठाकरे व मानाच्या वारकर्‍याचे कुटूंब व पुजारीच होते.


अशावेळी पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांना श्री. ठाकरे यांनी आषाढी एकादशी दिवशी मुंबईला परतीच्या प्रवासाला निघताना विश्रामगृहात भेट दिली. मुख्यमंत्री बाहेर निघत असतानाच आवताडे यांनी त्यांची भेट घेतली व त्यांना श्री विठ्ठल रखुमाईची मूर्ती देवून सन्मानीत केले. समाधान आवताडे हे आता भाजपाचे आमदार असले तरी ते 2014 ला पंढरपूर- मंगळवेढा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर लढले होते व त्यावेळी ठाकरे यांनी त्यांच्यासाठी मंगळवेढ्यात जंगी सभा घेतली होती. अनेक वर्षे आवताडे हे शिवसेनेत होते नंतर 2019 ला अपक्ष उभारले आणि 2021 च्या पोटनिवणुकीत त्यांनी भाजपात प्रवेश करून तिकिट मिळविले व विजय संपादन केला. येथून त्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखाली चालणार्‍या महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पराभूत केले आहे.
जुने सहकारी असणार्‍या आमदार आवताडे यांची आठवण कायम ठेवून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यांना भेट दिली. वास्तविक पाहता सोलापूर जिल्ह्यातील अनेक आमदार व पक्षाचे पदाधिकारीही त्यांना भेटू शकले नाहीत मात्र स्थानिक आमदाराचा मान राखत व नुकतेच ते विजयी झाले असल्याने त्यांना शुभेच्छा देण्याचा मोठेपणा ठाकरे यांनी दाखविला आणि त्यांना आमदार म्हणून चांगले काम करण्याचा सल्लाही दिला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मिश्किलपणे आवताडे यांना तुम्ही नावाप्रमाणे समाधानी दिसत आहात.. असे म्हणत त्यांच्या सन्मानाचा स्वीकार केला. 

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा IT Act 2000 नुसार गुन्हा आहे.
Close
Close