राज्यात गतवर्षीच्या तुलनेत वीस टक्के कमी पाणीसाठा , मराठवाड्यात सर्वात नीचांकी जलसाठा
पुणे- पावसाचे उशिरा झालेले आगमन याचबरोबर लहरीपणामुळे त्याची कमी जास्त प्रमाणात विविध भागात लागलेली हजेरी यामुळे यंदा गतवर्षीच्या तुलनेत सर्वच प्रकल्पांमध्ये सरासरी वीस टक्के कमी पाणीसाठा आहे. सर्वात नीचांकी जलसाठा हा मराठवाडा विभागात केवळ 31 टक्के इतकाच आहे. या पाठोपाठ नाशिक , अमरावती व पुणे विभागाचा क्रमांक लागतो.
राज्यातील दोन हजार 994 लहान, मध्यम व मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या 61 टक्के पाणी साठले असून मागील वर्षी याच तारखेला या धरणांमध्ये 80 टक्क्याहून अधिक जलसाठा झाला होता. सर्वात जास्त पाणी कोकणात 85.20 टक्के साठले आहे तर यापाठोपाठ नागपूर विभागात 70 तर अमरावतीमध्ये 66 टक्के जलसाठा झाला आहे. पुणे विभागात 68 टक्के पाणी सर्व प्रकल्पांमध्ये साठले आहे. मोठ्या धरणांचा विचार केला तर मराठवाड्यातील 44 धरणांमध्ये 38 तर पुणे विभागातील 35 प्रकल्पात 73 टक्के पाणीसाठा आहे. पावसाने ओढ दिल्याने अनेक धरण अद्याप भरण्याच्या प्रतीक्षेत असून यात उजनी सारख्या महाकाय प्रकल्पाचाही समावेश आहे.
सध्या राज्यातील 139 धरणांमध्ये 67 टक्के पाणीसाठा असून तो मागील वर्षीच्या तुलनेत 19 टक्के कमी आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये 55 तर लघु योजनांमध्ये केवळ 37.68 टक्के पाणी राज्यात साठले आहे. यामुळे सर्वत्र पावसाची प्रतीक्षा आहे. राज्यातील मोठ्या धरणांची स्थिती पुढील प्रमाणे आहे. कोयना 78 टक्के भरले असून उजनी 13.36 टक्के झाले आहे. तिल्लारी 79, भातसा 82.58, मुळशी 95, दूधगंगा 83.11, येलदरी 59, जायकवाडी 34, अपर वर्धा 84, इसापूर 64 तर गोसीखुर्द 45.10 टक्के भरले आहे.