उजनीतून शनिवारपासून कालवा व बोगद्यात पाणी सोडले जाणार
पंढरपूर – उजनी धरणातून सिंचनासाठी कॅनॉल व सीना भीमा जोडकालव्यात शनिवार चार नोव्हेंबरपासून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली. या आवर्तनासाठी सुमारे आठ टीएमसी पाणी लागणार आहे.
उजनी धरणातून सध्या सीना माढा योजनेसाठी 333 क्युसेक तर दहिगाव योजनेसाठी 120 क्युसेकने पाणी सोडले जात आहे. आता शनिवारपासून कालवा व बोगदा सुरू होत आहे. कॅनॉल मध्ये पाणी सोडण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. मात्र कालवा सल्लागार समितीची बैठक लांबत गेल्याने याचे नियोजन आज शुक्रवारी झालेल्या बैठकीत करण्यात आले.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक घेण्यात आली यास लाभक्षेत्रातील सर्व आमदार, पदाधिकारी, जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. उजनीतून रब्बी हंगामाचे हे पहिले आवर्तन असून ते चार नोव्हेंबर ते 14 डिसेंबर 2023 या कालावधीत सुरू राहणार आहे. तसेच या पाण्यातून माण नदीवरील आठ बंधारे भरून घेण्यात येणार आहेत. यानंतर यादरम्यान उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रातही पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कार्तिकी यात्रा व सोलापूरच्या पाणीपुरवठा करता म्हणून हे पाणी सोडले जाईल. यासाठीचे नियोजन सुरू असून यासाठी सहा टीएमसी पाणी लागणार आहे.
उजनी धरणातून रब्बी हंगामातील दुसरे आवर्तन देण्यासंदर्भातील नियोजन एक जानेवारी 2024 रोजी केले जाणार असून जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत हे पाणी दिले जाऊ शकते. तसेच रब्बीच्या दोन आवर्तनांना किती पाणी लागते हे पाहून उन्हाळा हंगामात शेतीला पाणी देणे शक्य होत असेल तर याचे नियोजन होईल. अन्यथा शिल्लक पाणी हे पिण्यासाठी म्हणून राखीव ठेवले जाणार आहे. दोन आवर्तनासाठी सुमारे 27.10 टीएमसी पाणी लागणार आहे. यात कालवा भीमा नदी व अन्य योजनांचा समावेश आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने उजनी धरण हे सध्या 54% भरलेले आहे सुमारे 50 टक्के पाणी गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे , हे पाहता पाण्याचे नियोजन काटकसरीने केले जात आहे. सध्या उजनीत एकूण पाणीसाठा 92.80 टीएमसी असून उपयुक्त पाणी हे 29.14 टीएमसी इतके आहे.