उजनी धरणातून भीमेत पाणी सोडले, सोलापूर शहरासह नदीकाठच्या गावांची झाली सोय
पंढरपूर – सोलापूर शहरासह भीमा नदीकाठावरील पाणी योजना व सिंचनासाठी उजनी धरणातून नदीत पाणी सोडण्याची प्रक्रिया गुरूवारी दुपारी बारा वाजल्यापासून सुरू झाली आहे. दरम्यान या प्रकल्पाची स्थिती आता वजा 3.60 टक्के अशी आहे.
मागील एक महिन्यापूर्वी उजनीतून भीमा नदीत सोडलेले पाणी आता कमी झाल्याने सतत पाणी सोडण्याची मागणी होत होती. सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारा औज बंधारा कोरडा पडू लागल्याने महापालिकेनेही पाण्याची मागणी केली होती. हे पाहता धरण व्यवस्थापनाने गुरूवारी 11 मे रोजी दुपारपासून पाणी सोडण्यास सुरूवात केली आहे. सुरूवातीला 1500 क्युसेकने पाणी सोडले गेले तर सायंकाळी हा विसर्ग साडेचार हजार क्युसेक करण्यात आला.
भीमा नदीकाठी अनेक गावांच्या पाणी योजना आहेत तसेच पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा यासारख्या शहरांचा पाणी पुरवठा हा नदीवरील बंधार्यांवर अवलंबून आहे. आता सोडण्यात येणार्या पाण्यातून हे बंधारे भरून जाणार असून पुढील एक ते दीड महिना हे पाणी पुरवावे लागणार आहे. याच दरम्यान पावसाळा सुरू होईल. सध्याची धरणाची पाणी स्थिती पाहता आता सतत पाणी सोडणे परवडणारे नाही. यंदा सलग कालवा सुरू राहिल्याने धरणातील पाण्याचा मोठा वापर होवून मे च्या सुरूवातीलाच धरण वजा पातळीत गेले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत एक महिना अगोदर ही स्थिती निर्माण झाली आहे.
सध्या उजनी धरणातील मृतसाठ्यात 61.73 टीएमसी इतके पाणी शिल्लक आहे. मृतसाठ्यातील 1.93 टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. उजनीतून कालव्यात 3 हजार क्युसेकने अद्यापही पाणी सोडले जात आहे. आता हे पाणी कमी करत बंद केले जाईल. भीमा सीना जोडकालव्यातील विसर्ग कमी करून तो 500 क्युसेकवर आणण्यात आला आहे. दहिगाव प्रकल्पात केवळ 40 क्युसेकचा विसर्ग सोडला जात आहे.
मागील आठ दिवसात उन्हाची तीव्रता कमालीची वाढली असून मागील चोवीस तासात 6.63 मिलीमीटर म्हणजे जवळपास 1 दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन नोंदले गेले आहे.