लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आता पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात पाकिस्तान-चीनमध्ये महत्त्वाचे करार होण्याची शक्यता आहे.
लडाखमध्ये चीनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताची चिंता आता आणखी वाढणार असल्याची चिन्हे आहेत. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग लवकरच पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये संरक्षणविषयक महत्त्वाचे करार होणार असल्याची दाट शक्यता आहे.
चीनच्या राष्ट्रपतीपदाची सूत्रे सांभाळल्यानंतर शी जिनपिंग यांचा हा पाकिस्तानचा दुसरा दौरा आहे. याआधी त्यांनी २०१५ मध्ये इस्लामाबादचा दौरा केला होता. जिनपिंग यांचा पाकिस्तान दौरा याआधी जूनमध्ये होणार होता. मात्र, करोना महासाथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द करण्यात आला. तर, २०२० मध्ये आता चीनच्या राष्ट्रपतींचा हा दुसरा परदेश दौरा असणार आहे. याआधी त्यांनी जानेवारीत म्यानमारचा दौरा केला होता.