सामाजिक

पंढरपूरनंतर आता देगलूर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाचा झटका बसणार : संजय कुटे

पंढरपूर- पंढरीची उर्जा घेवून देगलूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत जायचे आहे. महाविकास आघाडीस पहिला झटका पंढरपूर विधानसभेने दिला असून दुसरा झटका देण्यासाठी देगलूर सज्ज असल्याचा दावा भाजपाचे माजी मंत्री संजय कुटे यांनी केला.

सत्ताधारी असूनही मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार हे ओबीसी समाजाचे मेळावे घेत आहेत. तुम्ही मेळावे काय घेता न्याय द्या असा टोला कुटे यांनी लगावला. मागील दोन वर्षात ओबीसी योजनेसाठी एक रूपाया देखील खर्च केला नसल्याचा दावा करून छत्रपती संभाजीराजे यांनी केलेल्या मराठा समाजाच्या मागण्या देखील हे महाविकास आघाडी सरकार मान्य करीत नसल्याची टीका त्यांनी केली.

 ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे भाजपाच्यावतीने ओबीसी जागर अभियान सुरू करण्यात आले असून याचा शुभारंभ पंढरपूर येथून करण्यात आला. या अभियानाचा शुभारंभ संत नामदेव पायरी येथे विठुरायाला साकडे घालून करण्यात आला. येथे ओबीसी जागर अभियान रथाचेही उद्घाटन करण्यात आले. राज्यातील विविध भागात हा रथ फिरणार आहे. येथील मेळाव्यास माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, माजी मंत्री राम शिंदे व संजय कुटे, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, रणजितसिंह मोहिते-पाटिल, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते व प्रशांत परिचारक हे आमदार, सोलापूरच्या महापौर श्रीकांचना यन्नम, भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, प्रणप परिचारक, माउली हळणवर, प्रा.सुभाष मस्के आदींसह जिल्ह्यातील भाजपाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.पु

दोन वर्षापासून या सरकारने ओबीसी समाजाचा एम्पिरीकल डाटा गोळा केला नाही पण वसुली केली आहे. यामुळे आज आपले राजकीय आरक्षण रद्द झाले असून येत्या डिसेंबर पर्यंत हा डाटा गोळा न केल्यास मंत्र्यांना फिरू देणार नाही असा इशारा भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार योगेश टिळेकर यांनी दिला. ते म्हणाले, पंढरीच्या विठुरायाने सर्व जाती धर्माच्या संताना आपल्या अंगाखांद्यावर घेतले. म्हणून या बहुजनांच्या दैवतास सरकारला सद्बुध्दी द्या अशी प्रार्थना केली असल्याचे सांगितले. या महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यावर प्रथम मराठा समाजाचा घात केला. यानंतर ओबीसीचे आरक्षण रद्द केले. अनुसूचित जाती, जमाती यांना देखील यांच्या धोरणाचा फटका बसला आहे. या सरकारच्या काळात कोणीही सुखी, समाधानी नसल्याची टीका केली. ओबीसीचे राजकीय अस्तित्वच संपविण्याचा हा घाट असून आत्ताच जागृत झालो नाही तर भविष्यातील पिढी आपणास माफ करणार नाही अशी भीती व्यक्त केली.

ओबीसीचे राजकीय आरक्षण संपल्यामुळे आपल्या समाजाचे ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य होतील. परंतु सरपंच, महापौर, जि.प.अध्यक्ष होणार नाहीत. या सरकारमुळे दहा वर्षाने ओबीसीचा एकही आमदार असणार नाही असे सांगत या महाविकास आघाडी सरकारने आपला राजकीय गळा घोटला असल्याचा आरोप टिळेकर यांनी केला.माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी, ओबीसी वर्गाला आरक्षण देण्याची सुरूवात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या काळात झाल्याचे सांगितले. आज देखील केंद्रात मोदी सरकारमध्ये ओबीसींना सर्वाधिक २७ मंत्री असल्याची माहिती दिली.     

माजी मंत्री राम शिंदे यांनी, या घोटाळेबाज महाविकास आघाडी सरकारने कोणत्याही समाजाला सुखी केले नसल्याचा आरोप केला. तसेच प्रत्येक जिल्ह्यात आपल्याला ओबीसी मेळाव्याचे घेण्याची वेळ येणार नाही कारण तो पर्यंत हे सरकारच  राहणार नाही असा दावा केला.  कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रशांत परिचारक यांनी, ओबीस समाजामध्ये ३५० पेक्षा अधिक जाती असून आरक्षण रद्द झाल्यामुळे त्यांच्यावर आज मोठा अन्याय झाला असल्याचे सांगितले.दरम्यान मेळाव्यापूर्वी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ओबीसी समाजातील सर्व जातींची एक बैठक घेऊन यामध्ये त्यांच्या प्रश्‍नांची निवेदन स्वीकारण्यात आली.

Header

Related Articles

Back to top button
Close
Close