दुष्काळी तालुक्यांसाठी विशेष पॅकेजची पंतप्रधानांकडे मागणी
पंढरपूर – माढा लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट घेतली व व पश्चिम महाराष्ट्रातील 55 दुष्काळी तालुक्यांकरता विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी केली आहे.
सध्या लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून खासदार नाईक निंबाळकर यांनी या काळात पंतप्रधानांची भेट घेऊन दुष्काळी भागाकरता विशेष निधी द्यावा ,अशी मागणी केली. निंबाळकर हे ज्या माढा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात यातील माण, खटाव, सांगोला यासारखे तालुके दुष्काळी पट्ट्यातील आहेत. या भागात सिंचन योजना व्हाव्यात तसेच विविध योजनांचे पाणी या भागात यावे याकरिता ते सतत प्रयत्न करत आहेत. मध्यंतरी निरा देवघरचे पाणी सांगोला, पंढरपूर भागातही मिळावे तसेच माढा मतदारसंघातील माढा व करमाळा भागातही याचा लाभ व्हावा ,यासाठी खासदार निंबाळकर यांनी प्रयत्न केले आहेत. आता त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन दुष्काळी भागासाठी विशेष पॅकेज देण्याची मागणी केली आहे. याप्रसंगी निंबाळकर यांनी पंतप्रधानांचा सत्कारही केला.