अकलूजकरांनी भरवली ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धा, देशभरातून 500 महिला मल्ल सहभागी होणार
अकलूज – गत 5 वर्षापासून आम्ही महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेकडे महिलांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भरवण्याविषयी पत्रव्यवहार करत समक्ष गाठीभेटी घेत आहोत. परंतु त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला नाही. यामुळे आता येथील क्रीडा संकुलात दि 5, 6 व 7 मे 2023 रोजी मॅटवरील ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहितीप्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्षा शीतलदेवी मोहिते-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना शीतलदेवी मोहिते-पाटील म्हणाल्या, या कुस्ती स्पर्धेमध्ये गावते राष्ट्रीय पातळीवरील महिला मल्ल सहभागी होणार आहेत. नाव नोंदणीची अंतिम तारीख 28 एप्रिल असून वजने 5 मे रोजी सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत घेतली जातील. ऑनलाईन नांव नोंदणीसाठी महिला मल्लांनी व कुस्ती केंद्रांनी https://forms.gle/k4FSy7rRw4PDLSdJA या साईटवरती संपर्क साधावा.
या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी संपूर्ण देशातून महिला मल्ल येणार आहेत. परराज्यातील स्पर्धकांना एका बाजूचा रेल्वे प्रवास खर्च तर महाराष्ट्रातून एसटीने येणाऱ्या स्पर्धेकांना दोन्ही बाजूचा एसटी प्रवास खर्च देण्यात येणार आहे. स्पर्धकांची राहण्याची व जेवण्याची सोय करण्यात आली आहे. या स्पर्धा तीन दिवसांमध्ये सकाळी व संध्याकाळी मॅटवरती खेळवण्यात येतील. स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेते व सिने क्षेत्रातील प्रसिध्द कलावंत स्पर्धे दरम्यान हजेरी लावणार आहेत.
15 वर्षाखालील, 18 वर्षाखालील व वरिष्ठ अशा तीन गटामध्ये स्पर्धा खेळवण्यात येतील. तर 62 किलो वरील वजनगटामध्ये तृतीय विभागून 50 हजार रुपये, द्वितीय क्रमांकास 75 हजार रूपये तर प्रथम क्रमांकास 1 लाख रूपये व चांदीची गदा देण्यात येणार आहे. 15, 18 व वरिष्ठ गटामधील कुस्त्यांसाठी हजारो रूपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शीतलदेवी मोहिते-पाटील यांनी ताराराणी महिला प्रशिक्षण कुस्ती केंद्राची सुरूवात केली होती. सुरूवातील पालक आपल्या मुलींना प्रशिक्षणासाठी पाठवायला तयार नव्हते. परंतु स्वतः धैर्यशील मोहिते-पाटील व शीतलदेवी मोहिते-पाटील यांनी प्रत्यक्ष पालकांच्या गाठी भेटी घेऊन त्यांना मुलींना पाठवण्यासाठी तयार केले. अत्यंत कठोर शिस्त, कसदार आहार व तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या अपार मेहनतीने ताराराणीच्या महिला मल्लांनी नाव गाजवायला सुरूवात केली. तालुका, जिल्हाच नव्हे तर या कुस्ती केंद्राच्या मुलींनी नॅशनल स्पर्धांमध्ये यश संपादन केले. हे कुस्ती केंद्र थोडे दिवस चालेल आणि नंतर बंद पडेल अशीच शक्यता अनेकांनी वर्तवली होती. परंतु आज याच प्रशिक्षण केंद्राकडून महिलांच्या केसरी स्पर्धा घेण्यात येत आहेत. यामध्ये जिल्हा ते राष्ट्रीय स्तरावरील सुमारे 500 महिला मल्ल सहभागी होतील. हा टप्पा गाठण्यासाठी शीतलदेवींनी व त्यांच्या टीमने खूप मेहनत घेतली आहे.
या पत्रकार परिषदेच्यावेळी जेष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील, सत्यप्रभादेवी मोहिते पाटील, विश्वतेजसिंह मोहिते पाटील, श्रीकांत राऊत, नितीन बनकर, अश्रफ शेख, काकासाहेब जगदाळे, एस. एम. शिंदे, हेमलता रणवरे, महेश ढेंबरे, राहुल जगताप, राहुल कोडग, आण्णा कदम, कुस्ती कोच सतपालसिंग, सुहास तरंगे उपस्थित होते.