कल्याणराव काळे – भगिरथ भालके दोघे मिळून सहकारमंत्र्यांच्या भेटीला
पंढरपूर- काही दिवसांपूर्वीच पंढरपूर तालुका राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष अॅड. दीपक पवार यांनी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेवून त्यांना संभाव्य निवडणूक होणार्या सहकार शिरोमणी कारखान्याची सभासद यादी बाबतच्या तक्रारीचे निवेदन दिले होते. तर आज राष्ट्रवादीचे नेते कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भगिरथ भालके यांच्यासह मंत्रिमहोदयांची वाढदिवसानिमित्त भेट घेतली व त्यांचा सत्कार केला.
पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात व सहकारात कल्याणराव काळे यांना राष्ट्रवादीमधीलच अॅड. दीपक पवार हे विरोध करतात हे सर्वश्रृत आहे. सहकार शिरोमणी कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी यापूर्वी पॅनल उभा केला होता व आता ही त्यांची तयारी सुरू आहे. मात्र सध्या कोरोनामुळे तालुक्यातील दोन्ही साखर कारखान्याच्या निवडणुका या पुढे गेल्या आहेत. मात्र जेंव्हा कधी त्याची घोषणा होईल तेंव्हा काळें विरूध्द पवार असा सामना रंगणार आहेच. काळे हे राष्ट्रवादीमध्ये येताच अॅड. दीपक पवार यांना पदावरून हटवून त्यांच्या जागी भगिरथ भालके यांचे समर्थक विजयसिंह देशमुख यांना संधी मिळाली होती. यामुळे तर येथील राष्ट्रवादीत वाद उफाळून आला होता. आता पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाल्यानंतर येथील पक्षातील पदाधिकार्यांनी ऐकी दाखवावी अशी वरिष्ठांची इच्छा असली तरीही येथे कुरबुरी संपलेल्या नाहीत. याचा परिचय मागील काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आला आहे. त्यांना अगोदर काळे यांच्या आढीवच्या फार्म हाऊसला जावे लागले यानंतर कासेगावला देशमुखांच्या निवासस्थानी. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीमधील पदाधिकार्यांच्या कुरबुरी ऐकून घेत येथील प्रश्न मिटविण्यासाठी पक्षाअंतर्गत समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान सध्या साखर कारखान्यांकडे थकीत असलेल्या शेतकर्यांचा बिलाचा प्रश्न ही भेडसावत आहे. कालच स्वाभिमानी शेतकरी संघटनेेने विठ्ठल कारखान्याने जुलै अखेरपर्यंत थकीत ऊसबिलाचा निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. सातत्याने येथे विविध शेतकरी संघटना ऊसबिलाची मागणी करत आहे. काही दिवसांपूर्वी कारखान्यांना आरआरसी कारवाईच्या नोटिसा ही बजावण्यात आल्या होत्या. 2018-19 मध्ये तालुक्यातील काळे यांचा सहकार शिरोमणी व भालके यांचा विठ्ठल कारखाना गाळप करू शकला नव्हता. यानंतर 2019-20 मध्ये कै. आमदार भारत भालके यांनी महाविकास आघाडी सरकारकडून या दोन्ही कारखान्यांसाठी गाळपाची परवानगी आणली होती. यामुळे हे कारखाने सुरू झाले पण अपेक्षेप्रमाणे गाळप होवू शकलेले नाही. आता 2021-22 च्या गळीत हंगामासाठी सर्वच कारखाने तयारी करत आहेत. यंदा ऊसही जास्त आहे. अशा परिस्थिती कारखान्यांना सरकारच्या मदतीची गरज आहे. यामुळे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचे अनेक कारखानदार भेट घेत आहेत.