मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रानंतर अभिजित पाटील यांचे सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारीत पदार्पण, सांगोला कारखाना चालविणारा
पंढरपूर- सांगोला सहकारी साखर कारखाना जो गेल्या नऊ वर्षांपासून बंद आहे तो चालवायला घेण्याचा निर्णय पंढरपूरचे उद्योगपती तथा मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात तीन कारखाने चालविणार्या अभिजित पाटील यांनी घेतला आहे. याबाबत कारखाना व पाटील यांच्यात करार झाला आहे. येत्या हंगामात हा कारखाना सुरू होत असल्याने सांगोला तालुक्यासाठी ही सकारात्मक बाब म्हणावी लागणार आहे.
सांगोला कारखाना हा ऊस व पाण्याअभावी जवळपास नऊ वर्षे बंद आहे. नुकतेच राज्यातील बारा सहकारी साखर कारखाने हे भाडेतत्वावर चालविण्यास देण्याचे राज्य सहकारी बँकेने ठरविले होते. राज्यात जे सहकारी साखर कारखाने विविध कारणास्तव बंद पडले आहेत त्यांच्याकडे जिल्हा बँकांसह विविध वित्तीय संस्थांचे कर्ज अडकले आहे. यामुळे या बँकांसमोर ही अडचणी निर्माण होत असल्याने कारखाने चालविण्यास देण्याचा निर्णय झाला होता. यात सांगोला सहकारी साखर कारखान्याचाही समावेश आहे.
दरम्यान ज्यांनी हा साखर कारखाना चालविण्यास घेतला आहे ते अभिजित पाटील पंढरपूर तालुक्यातील उद्योगपती असून त्यांनी येथे डीव्हीपी उद्योग समूह उभारला आहे तर उस्मानाबाद, नांदेड व नाशिक या तीन जिल्ह्यात तेथील साखर कारखाने चालविण्यास घेतले आहेत. धाराशिव साखर कारखाना युनिट एक ते तीन हे यशस्वीपणे चालविण्यात ते यशस्वी ठरले आहेत. पंढरपूरचे उद्योजक असून ही त्यांनी मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राच्या साखर कारखानदारीत हात घालून यश संपादन केले असून आता ते सांगोला सहकारी हा दुष्काळी पट्ट्यातील आणखी एक साखर कारखाना चालविण्यास सज्ज झाले आहेत. चांगला दर व विस्तारीकरणाच्या माध्यमातून त्यांनी साखर कारखानदारीत यश मिळविले आहे. त्यांनी सर्वप्रथम धाराशिव कारखान्यात कोरोनाकाळात ऑक्सिजन प्लांट उभा करण्याचा मान मिळविला होता. दरम्यान सांगोला कारखान्याच्या माध्यतातून अभिजित पाटील यांचे सोलापूर जिल्ह्याच्या साखर कारखानदारीत पदापर्ण झाले आहे.
पाण्याचे दुर्भिक्ष व अल्प ऊस क्षेत्रामुळे गेल्या काही वर्षांपासून बंद असलेल्या सांगोला तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे धुराडे पेटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा साखर कारखाना येत्या गळीत हंगामापासून पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांनी दिली. धाराशिव साखर कारखान्याचे प्रमुख अभिजित पाटील यांनी सांगोला तालुका शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतला असून तसा करार झाल्याने चालू वर्षी साखर कारखाना सुरू होणार आहे. मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, अभिजित पाटील, शिखर बँकेचे अध्यक्ष अनास्कर, दीपक साळुंखे-पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक देशमुख यांची बैठक झाली. यात सांगोला साखर कारखाना भाडेतत्त्वावर अभिजित पाटील यांना चालवण्यास देण्याचे सर्वानुमते ठरले.
आता साखर कारखाना सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाल्याने ऊस उत्पादक शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण सांगोला कारखान्याचे धुराडे यंदा पेटणार अभिजित पाटील चालविणार भाडेतत्त्वावर दीपक साळुंखे अभिजित पाटील पसरले आहे. दुष्काळी सांगोला म्हणून ओळख असलेल्या तालुक्यात टेंभू, म्हैसाळ, नीरा उजवा कालवा तसेच सांगोला शाखा कालवा या सिंचन योजनांद्वारे तालुक्याच्या अनेक भागात पाणी आल्याने अलीकडील काळात उसाचे क्षेत्र वाढू लागले आहे. हा कारखाना धाराशिव कारखान्याने चालविण्यास घेतल्याने आगामी काळात तो प्रगतिपथावर दिसून येईल अशी सार्यांना आशा आहे.